Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघांची घोषणा केली. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याचा पहिला सामना टीम ए आणि टीम बी यांच्यात होणार आहे. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रोहित आणि कोहली न खेळण्याचे कारण दिले आहे.
कोहली आणि रोहितबाबत जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार,जय शाह म्हणाले की, “त्यांच्याशिवाय प्रत्येकजण खेळत आहे. याचे कौतुक करायला हवे. बुची बाबू स्पर्धेत इशान किशन आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत. पण आम्ही विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंवर खेळण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. असे केल्यास त्यांना दुखापत होण्याचा धोका असतो. तुमच्या लक्षात आले असेल की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. आम्ही खेळाडूंचा आदर करतो.”
दुलीप ट्रॉफीसाठी टीम ए बद्दल बोलायचे तर शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि मयंक अग्रवालसारखे दिग्गज खेळाडू आहेत. टीम बी चे कर्णधारपद अभिमन्यू ईश्वरनला मिळाले आहे. रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांना त्यात स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाडकडे टीम सी चे कर्णधारपद मिळाले आहे. साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव आणि रजत पाटीदार या संघात आहेत. तर डी टीमचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे. इशान किशन हा या टीमचा एक भाग आहे.
उल्लेखनीय आहे की, ईशान किशनला बीसीसीआयने करारातून काढून टाकले होते. तो बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नव्हता. पण आता तो परतला आहे. बुची बाबू क्रिकेट स्पर्धेतही तो खेळणार आहे.