Team India Schedule: आता 40 दिवसांनंतर टीम इंडिया उतरणार मैदानात..! जाणून घ्या, कसं असणार आगामी वेळापत्रक…

Team India Next Cricket Schedule : भारताने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली. पण वनडे मालिकेत लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ 40 दिवस विश्रांती घेणार आहे. यानंतर संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे भारताला यावर्षी एकदिवसीय मालिका खेळणार नाही. टीम इंडिया फक्त कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे.
बांगलादेश क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
बांगलादेशपाठोपाठ टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका (आॅक्टोबर-नोव्हेंबर) खेळवली जाणार आहे. यामध्ये पहिली कसोटी बंगळूरूमध्ये 16 ते 20 आॅक्टोबर, दुसरी पुणे येथे 24 ते 28 आॅक्टोबर तर तिसरी कसोटी मुंबईत 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी खूप घाम गाळावा लागणार आहे.
श्रीलंकेने अलीकडेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला आहे. श्रीलंकेने दोन सामने जिंकले आणि एक सामना बरोबरीत राहिला. या मालिकेत रोहित शर्माशिवाय जवळपास सर्वच खेळाडू फ्लॉप ठरले होते. अक्षर पटेलनेही चांगली कामगिरी केली. पण केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यासह सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. राहुल आणि अय्यर दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले. मात्र त्यांना चांगली व अपेक्षित कामगिरी करता आली नाही.





