Mohammed Shami : मोहम्मद शमीचा कहर जारी…! वयाच्या पस्तीशीतही ‘SMAT’मध्ये ओकतोय आग, आकडेवारीने वेधलं लक्ष

Mohammed Shami 4 Wickets haul against Haryana in SMAT 2025 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असला, तरी त्याच्या गोलंदाजीतील आत्मविश्वास आणि धार किंचितही कमी झालेली नाही. निवड समिती त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देत नसली तरी, शमी आपल्या मैदानातील कामगिरीने निवडकर्त्यांना मजबूत संदेश देत आहे. तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत असून त्याने शानदार प्रदर्शन केले आहे.
हरियाणाविरुद्ध शमीची भेदक गोलंदाजी –
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहम्मद शमीने हरियाणाविरुद्ध बंगालसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. शमीने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ३० धावा देत ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याची अचूक लाईन-लेंथ आणि अनुभवापुढे हरियाणाचे फलंदाज जास्त वेळ टिकू शकले नाहीत.
या सामन्यात शमीने यशवर्धन दलाल, सुमित कुमार, आशीष सिवाच आणि अमित राणा या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या चेंडूंमध्ये असलेला वेग आणि स्विंग स्पष्टपणे दिसत होता, ज्यामुळे सामन्याची दिशा बंगालच्या बाजूने वळली. शमीच्या या स्पेलची गणना स्पर्धेतील सर्वात प्रभावी स्पेलमध्ये केली जात आहे.
हेही वाचा – Team India : टीम इंडियाला मालिका विजयानंतर मोठा झटका! ICC ने केली मोठी कारवाई, नेमकं कारण काय? जाणून घ्या
स्पर्धेत सातत्याने शानदार प्रदर्शन –
मोहम्मद शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. तो बंगाल संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असून, प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे हे सातत्यपूर्ण प्रदर्शन हे स्पष्ट करते की, तो अजूनही टीम इंडियासाठी पूर्णपणे तयार आहे.
Mohammed Shami’s performance in the last three T20 matches. He is national team material. pic.twitter.com/46ZtPrdgsD
— 2R.Patel (@RajaRam05453055) December 8, 2025
मोहम्मद शमी संघातून कधीपासून बाहेर?
मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल खेळला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला सतत डावलले का जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि आयपीएल –
३५ वर्षीय शमीने भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २२९, वनडेत २०६, तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २७ विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये तो १२० सामन्यांत १३३ विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी त्याला एसआरएचने एलएसशी १० कोटींमध्ये ट्रेड केले आहे. शमीचे घरच्या मैदानावर असेच प्रदर्शन सुरू राहिल्यास, टीम इंडियामध्ये त्याच्या पुनरागमनाची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही.





