Team India : नव्या कर्णधाराची विराट-रोहितशी भेट! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या खास क्षणाचा VIDEO व्हायरल

Team India New ODI Captain Shubman Meets Rohit Virat : भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून, ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. विशेष बाब म्हणजे, या मालिकेतून शुबमन गिल भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची सुरुवात करणार आहे. यावेळी भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या विराट-रोहितची शुबमन गिलशी पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना –
एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात रोहित शर्माला स्थान मिळाले असले तरी, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीचा विचार करून मुख्य निवड समितीने शुबमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा पहिला गट १४ ऑक्टोबरच्या सायंकाळी रवाना झाला. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
गिलने घेतली रोहितची भेट –
𝙀𝙣 𝙧𝙤𝙪𝙩𝙚 𝘿𝙤𝙬𝙣 𝙐𝙣𝙙𝙚𝙧 ✈️
Of familiar faces and special reunions as #TeamIndia depart for the Australia challenge 😍#AUSvIND pic.twitter.com/ElV3OtV3Lj
— BCCI (@BCCI) October 15, 2025
या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा नवा एकदिवसीय कर्णधार शुबमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील हृद्य भेट दिसून येते. हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीत दोघांनी एकमेकांना मिठी मारली. गिल जेव्हा रोहितला भेटायला गेली, तेव्हा रोहित कशात तरी व्यस्त होता, पण गिलने त्याच्या पाठीवर हात ठेवताच दोघांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. विशेष म्हणजे, रोहित शर्माने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते.
गिलने बसमध्ये घेतली विराटची भेट –
शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्यातील भेटीचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानतळाकडे जाणाऱ्या संघाच्या बसमध्ये ही भेट झाली. गिल बसमध्ये चढला, तेव्हा कोहली अगदी पुढच्या सीटवर बसला होता. यावेळी गिलने कोहलीशी हस्तांदोलन केले, तर कोहलीने त्याला शाबासकी दिली. विराट-रोहितला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कोहलीने पण आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात खेळला होता.





