मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या युएईमध्ये आशिया कप खेळत आहे. सुपर-4 टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने (Team India) पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात करत फायनलच्या दिशेने मजल मारली आहे. मात्र, याच वेळी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आशिया कपच्या फायनलनंतर अवघ्या चार दिवसांत भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पंतच्या दुखापतीचे कारण 27 वर्षीय ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले, ज्यामुळे तो शेवटचा कसोटी सामना खेळू शकला नाही. सध्या तो बंगळुरूमधील बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकादमी (सेंटर ऑफ एक्सलन्स) येथे पुनर्वसन प्रक्रियेत आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पंतने अद्याप यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा सराव पुन्हा सुरू केलेला नाही. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल. पंतच्या पुनरागमनाची शक्यता वैद्यकीय अहवालानुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागेल, जो सप्टेंबरच्या सुरुवातीला संपला आहे. तरीही, त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. तथापि, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो फिट होण्याची शक्यता आहे. सध्या तो बंगळुरूत स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. पंतच्या जागी ध्रुव जुरेलची वर्णी? ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला भारतीय कसोटी संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यात पंतच्या दुखापतीनंतर जुरेलने यशस्वीपणे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटीत आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथील चौथ्या कसोटीत त्याने यष्टीरक्षण केले, तर ओव्हल येथील पाचव्या आणि अंतिम कसोटीतही तो भारतीय संघाकडून खेळला. त्याच्या या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघासमोरील आव्हाने पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला यष्टीरक्षण आणि फलंदाजीच्या बाबतीत नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत. पंत हा आक्रमक फलंदाजी आणि सातत्यपूर्ण यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो, त्यामुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी मोठी पोकळी निर्माण करू शकते. आता सर्वांचे लक्ष बीसीसीआयच्या निवड समितीकडे आहे. ते पंतच्या जागी कोणाला संधी देतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.