Teachers’ Day : शिक्षक दिन विशेष.! शिक्षक, कलाकार ते उपमहापौर… ‘श्रीकृष्ण वैद्य’ यांची प्रेरणादायी कहाणी
श्रीकृष्ण वैदौद्य सर यांनी मराठी व्याकरणावर २१ वर्ष संशोधन केले व त्या संदर्भात ३००० पानांचा ग्रंथ लिहीला. मात्र दुर्दैवाने तो ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रसिध्द झाला नाही.

Teachers’ Day : निष्ठावंत शिक्षक व भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती पित्यर्थ भारतात ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. जो,जे आपल्याला मार्गदर्शन करील तो, ते आपले शिक्षकच. माझे इंग्रजी क्लासेसचे शिक्षक श्रीकृष्ण वैद्य होते. क्लासेस सुरु करण्यापुर्वी ते रविवार पेठेतील ‘भारत हायस्कुल’ येथे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांची बदली केल्याने विद्यार्थ्यांनी संप केला, वर्ग रिकामा पडला. वैद्य सरांनी त्यांची समजुत काढुन वर्गात येण्यास भाग पाडले.इतके विद्यार्थ्यांचे प्रेम त्यांनी मिळवले.
क्लासेस सुरु केले…
भारत हायस्कुल मधील शिक्षक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी सोमवार पेठेतील दारुवाला पुलाजवळ इंग्रजी व गणिताचे ‘श्रीकृष्ण वैद्य’ क्लासेस या नावाने सुरु केले. अल्पशा फी व दोन्ही विषयात तरबेज असल्याने विद्यार्थ्यांचा ओघ सुरु झाला. वैद्य स्वत: एम.ए संस्कृत होते,परंतु त्यांचे माय मराठी,विशेषत: मराठी विशेषता मराठीच्या व्याकरणावर अपार प्रेम होते.
अनेक कला अवगत होत्या…
शिक्षकाखेरीज त्यांच्या अंगी अनेक गुण होते. लेखन जादुचे प्रयोग, अभिनय,राजकारण ते समाजकारण इ.इ.पु.ल.देशपांडे कृत ‘तुज आहे तुज पाशी’या नाटकात त्यांनी काकाजीची भुमिका केली, ती तुफान गाजली. त्याचे अनेक प्रयोग झाले. तसेच मृच्छकटीका व उरुभंग या नाटकात अनुक्रमे शाकार दुर्योधनाची भुमिका त्यांनी लिलया पार पाडली. दुर्योधनाच्या उत्कृष्ट भुमिकेबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले.
समाजकारणात ही सहभाग !
दारुवाला पुल गणेशोत्सव मंडळ स्थापन करुन गणेशोत्सव सुरु केला.गरीब विद्यार्थ्यांना फी माफ केली. यामुळे ते विद्यार्थी व पालकांमध्ये नावाजलेले होते. सर्वांच्या आग्रहामुळे १९७० च्या मनपा निवडणुकीस उभे राहिले व प्रचंड बहुमतांनी निवडुन आले. १९७३ मध्ये ते उपमहापौर पदी विराजमान झाले.
विशेष म्हणजे त्यांचे शिष्य शांताराम दिवेकर महापौर होते. अशी गुरु-शिष्याची कारर्कीद समाजोपयोगी ठरली. त्यांच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यात आल्या.प्रथेप्रमाणे त्यांच्या स्वागतास महापौर जाणे अपेक्षित होते. परंतु ते काही कारणास्तव जाऊ शकले नाही. त्यामुळे उपमहापौर नात्याने वैद्यसर त्यांच्या स्वागतास विमानतळावर गेले व त्यांच्या समवेत अनेक कार्यक्रमात सहभागी झाले.
मराठी व्याकरणावर संशोधन…
श्रीकृष्ण वैदौद्य सर यांनी मराठी व्याकरणावर २१ वर्ष संशोधन केले व त्या संदर्भात ३००० पानांचा ग्रंथ लिहीला. मात्र दुर्दैवाने तो ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रसिध्द झाला नाही. तथापि त्यांच्या चिरंजीवांनी सरांचे स्वप्न साकार करण्याचा मानस केला होता. अशा बहुआयामी माझे इंग्रजीचे शिक्षक श्रीकृष्ण वैद्य यांना शिक्षक दिनी मानाचा मुजरा.
– श्रीराम यादव, पुणे





