Tathawade Case: ताथवडे अत्याचारप्रकरणी ‘जनआक्रोश’! हिंदू संघटनांसह विविध पक्ष रस्त्यावर; कठोर शिक्षेची मागणी
Tathawade Case: ताथवडे येथील १० वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचाराविरोधात नागरिक रस्तावर; हिंदू संघटनांसह विविध पक्षांचा भव्य 'जनआक्रोश मोर्चा'.

Tathawade Case – ताथवडे येथील दहा वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २९) नागरिक रस्त्यावर उतरले. हिंदू संघटनांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‘बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘दोषींना फाशी द्या’, ‘महिलांवरील अत्याचार बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन घटनेविरोधात संताप व्यक्त केला. ‘अत्याचार करणाऱ्यांना क्षमा नाही’, ‘पीडितेला तातडीने न्याय द्या’, ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा’ अशा मागण्यांचे फलक झळकत होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोर्चात दिसून आला.
मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तपास तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी भूमिका यावेळी करण्यात आली. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी,
यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५, रा. ताथवडे) याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून वाकड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





