Bangladesh New PM: तारिक रहमान बनले बांगलादेशचे पंतप्रधान, ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
Bangladesh New PM: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे प्रमुख तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Bangladesh PM: बांगलादेशच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे प्रमुख तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी ६० वर्षीय रहमान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
प्रदीर्घ काळ चालत आलेल्या परंपरेला छेद देत, हा शपथविधी सोहळा ‘बंगभवन’ ऐवजी संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी ढाका येथे दाखल झाले होते. भारताच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Tarique Rahman sworn in as Bangladesh PM, ending BNP’s 20-year hiatus
Read @ANI Story |https://t.co/eWqGTwJZvX#Bangladesh #TariqueRahman #PrimeMinister #BangladeshNews pic.twitter.com/dCVBDk8q3Z
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2026
बीएनपीला मिळाले प्रचंड बहुमत –
बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. संसदेच्या २९७ जागांपैकी बीएनपीने २०९ जागांवर दणदणीत विजय मिळवून सत्ता काबीज केली. तर, जमात-ए-इस्लामी पक्षाला ६८ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीगला या निवडणुकीत लढण्यास बंदी घालण्यात आली होती.
मंत्रिमंडळाचा विस्तार: नव्या चेहऱ्यांना संधी –
पंतप्रधान तारिक रहमान यांच्यासोबत २५ मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. २५ मंत्र्यांपैकी १७ नवीन चेहरे आहेत. सर्व २४ राज्यमंत्री पहिल्यांदाच या पदावर विराजमान झाले आहेत. स्वतः पंतप्रधान तारिक रहमान हे देखील पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचे सदस्य बनले आहेत.
कोणाकडे कोणते मंत्रालय? (प्रमुख मंत्री)
| मंत्री | मंत्रालय |
| सलाहुद्दीन अहमद | गृह मंत्रालय |
| अमीर खसरू महमूद चौधरी | वित्त आणि नियोजन |
| खलीलुर रहमान | परराष्ट्र मंत्रालय |
| मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर | स्थानिक प्रशासन आणि ग्रामीण विकास |
| इक्बाल हसन महमूद तुकू | ऊर्जा आणि खनिज संपत्ती |
| एहसानुल हक मिलन | शिक्षण मंत्रालय |
| मोहम्मद असदुज्झमान | कायदा आणि न्याय |
शफीकुर रहमान विरोधी पक्षनेते –
जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांची १३ व्या बांगलादेश संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच नॅशनल सिटीझन्स पार्टी (NCP) च्या निमंत्रक नाहिद इस्लाम या विरोधी पक्षाच्या ‘चीफ व्हिप’ असतील.
The Indian Air force special aircraft carrying the Indian delegation led by Lok Sabha Speaker @ombirlakota landed at the #Bangladesh Air force airbase at Dhaka to attend Tarique Rahman oath taking ceremony.
Bangladesh Ministry of Foreign Affairs Secretary Dr Md. Nazrul Islam,… pic.twitter.com/HBGBIxmgHC
— SansadTV (@sansad_tv) February 17, 2026
भारताची उपस्थिती आणि संबंधांवर भर –
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ढाका येथे पोहोचल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव नझरुल इस्लाम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बिर्ला म्हणाले की, “हा एक महत्त्वपूर्ण क्षण असून यामुळे भारत आणि बांगलादेशमधील जनसंपर्क आणि सामायिक लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतील.”
हेही वाचा – मार्चपासून पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार? रावी नदीवरील धरण तयार, भारताचा नेमका प्लॅन काय?





