Bangladesh News: पंतप्रधान रहमान यांची हिंदूंसाठी मोठी घोषणा केली
Bangladesh News : १७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'बांगलादेश नॅशनल पार्टी'चे (BNP) नेते तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाची सूत्रे हाती घेतली.

Bangladesh News: दीर्घकाळापासून सुरू असलेल्या राजकीय अशांती आणि हिंसाचारानंतर बांगलादेशात अखेर नव्या युगाची सुरुवात झाली आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’चे (BNP) नेते तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला असून, विशेषतः हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा केली आहे.
कायद्याचे राज्य हीच प्राथमिकता –
पंतप्रधान तारिक रहमान यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. “देशात शांतता प्रस्थापित करणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही पक्षाचा दबाव, जात, धर्म किंवा पंथ याचा विचार न करता केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार चालवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : रस्ते अपघातातील जखमींना दीड लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार
अल्पसंख्याकांसाठी आशेचा किरण –
गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांना मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर रहमान यांनी सर्व समुदायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी विशेष योजना आणि कठोर उपाययोजनांची घोषणा केल्याने पीडित कुटुंबांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध धंद्यांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राईक’ –
देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जुगार आणि अंमली पदार्थांची तस्करी कारणीभूत असल्याचे सांगत, रहमान यांनी अशा उपद्रवी घटकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी यंत्रणांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करण्याचे निर्देश देण्यात आले असून भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
“राज्य चालवताना कायद्याचे राज्य हाच अंतिम शब्द असेल. कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही.”
— पंतप्रधान तारिक रहमान





