वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे टार्गेट

दीड महिन्यात 13 हजार 700 वाहनचालकांना दंड
नगर – दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांवर मोबाईल वापरणे, ट्रीपलसीट, सीट बेल्ट न लावणे, तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांसह, इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत दीडमहिन्यात 13 हजार 700 वाहनांवर कारवाई केली असून शहर वाहतूक शाखा कारवाईत जिल्ह्यात अव्वल असल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे.
शहरासह जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना दुचाकीस्वरांना हेल्मेटची जाणीव व नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तसेच वाहतुकीचे उल्लंघन करण्याऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांची कारवाई मोठ्याप्रमाणात सुरू आहे. शहरातील विविध चौकात शहर वाहतूक पोलिसांनी पथके तैनात करून, दीड महिन्यात 10 हजार 700 वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे.
यामध्ये हेल्मेट व दुचाकी व चारचाकी चालवितांना मोबाईलवर बोलने, तसेच वाहनांचा इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे दुचाकी, चारचाकीसह एक हजार अवजड वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याने वाहनचालकांना चांगलीच चपराक बसणार आहे.
शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक, स्टेट बॅंक चौक, चांदनी चौक, कायनेटीक चौक, सक्कर चौक तसेच प्रेमदान चौकात कारवाई करण्यासाठी विविध पथके शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने अचानक तैनात करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरला जाणार आहे.
तसेच ही कारवाई पुस्तकी पावतीऐवजी ई-चलन पावतीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. शहर वाहतूक विभागासाठी पोलिसांना 25 ई-चलन मशिन देण्यात आल्या आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत असून शहर वाहतूक पोलीस विभागाला जिल्हाभरात एकूण 50 ई- चलन मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ई-चलन मशिन नगर शहरासाठी 25 मशिन तर त्या पाठोपाठ शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, शेवगाव या तालुक्यात उर्वरीत मशिन देण्यात आल्या आहेत.





