Pune District : निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली

खेडमधील गट-गण रचनेत अधिकार्यांनी केली मनमानी
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे, असा आक्षेप जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा पुणे जिल्हा भाजप माजी अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात कधीही अशी रचना झाली नव्हती, अशी विचित्र रचना करण्यात आली आहे. खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा, शहरी पट्टा आणि पूर्व पट्टा याचा कशाचाही ताळमेळ यामध्ये दिसत नाही. निवडणूक आयोगाने गट आणि गणाची रचना आटोपशील करावी अशी लेखी कळविले असताना, आमच्याकडे रचना करण्यात आलेला आंबेठाण पंचायत समिती गण तब्बल 38 किलोमीटर लांबीचा आहे. तर काळुस जिल्हा परिषद गट 28 ते 30 किलोमीटर लांबीचा केला आहे.
या गटाचे एक टोक राजगुरुनगर शहराजवळ, दुसरे शेलपिंपळगाव जवळ तर तिसरे एकदम मावळात आहे. हे नकाशा बारकाईने बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. खेड तालुक्याच्या गट रचनेवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि हुकूमशाही यातून पाहायला मिळते. याबद्दल आवाज उठवला नाही तर एक दिवस खेड तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे.
दुर्दैवाने आपले राजकीय नेते आणि कार्यकर्ते सगळ्याच गोष्टी राजकीय दृष्टीने पाहून एकमेकांवरती आरोप करत बसतात. परंतु याला जबाबदार असलेले अधिकारी यांना जाब विचारणे गरजेचे आहे. एखाद्या साध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी ही गट रचना पाहिली तरी ती त्याला मान्य होणार नाही अशा पद्धतीने करण्यात आली आहे.
गट आणि गणाची रचना फक्त निवडणुकीपुरतीच नसते तर याचे विकासाच्या प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होणारे असतात. या गटाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या योजनेच्या अंमलबजावणीची यंत्रणा उभी केली जाते. ही रचना अशा चुकीच्या पद्धतीने का करण्यात आली याच्या खोलात गेल्यानंतर मिळत असलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे.
– शरद बुट्टे पाटील, माजी गटनेते, जिल्हा परिषद, पुणे





