तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद: डॅा अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe | पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी प्रसूतीसाठी पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयाने 10 लाख रुपये जमा करण्याची अट घातली आणि अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवूनही तिला दाखल करून घेतलं नाही, असा आरोप तनिषा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
परिणामी, तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं, पण वाटेतच त्यांची प्रकृती खालावली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. पण मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तनिषा यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. या घटनेनंतर आता रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेवर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं… ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला नाकर्तेपणा उघड करणारी आहे.
सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं… ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला…
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 3, 2025
विशेष म्हणजे पीडित भगिनी ही सत्ताधारी आमदारांशी संबंधित होत्या, त्यांच्यावर उपचार करावेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विनंतीही करण्यात आली होती, तरीही हे “धर्मादाय” रुग्णालय आपल्या असंवेदनशील भूमिकेवर ठाम राहिले. या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी ! अशी मागणी कोल्हे यांनी एक्सवरुन पोस्ट शेअर करत केली आहे.




