तानाजी सावंतांच्या मुलासाठी रान पेटवले, पण कृष्णा आंधळे सापडेना; सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर आरोप

Tanaji Sawant : शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा बँकॉकला जाणारा चार्टर्ड फ्लाइटप्रवास चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाच्या कथित अपहरणाची तक्रार केल्यानंतर पुणे पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत विमान माघारी वळवले. यामुळे राजकीय वर्तुळात तानाजी सावंत यांचे प्रभाव आणि पुणे पोलिसांची तत्परता चर्चेचा विषय बनली आहे. दुसरीकडे तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
माजी मंत्री सावंत यांनी खोटा गुन्हा दाखल करून मुलाला परत आणलं अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 60 दिवस उलटूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर हल्लाबोल केला आहे. तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारने रान पेटवले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले, तर कृष्णा आंधळेला गजाआड केले असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलिस किती तत्पर आहेत, याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु, याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही, असं सुळे म्हणाल्या
पुढे बोलताना म्हणाल्या, कालच्या घटनेत वरपासून खालपर्यंत यंत्रणा हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले, तर कृष्णा आंधळे गजाआड होईल. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही हा खरा प्रश्न आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तानाजी सावंत यांच्या मुलासाठी या सरकारने काल रान पेटवले होते. पण 60 दिवस उलटूनही कृष्णा आंधळे सापडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
मंत्र्यांच्या मुलासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला, गोरगरिबांचा काय?
आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मंत्र्याची मुलं जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या सुरक्षिततेचं काय? असा एक विचार मनात आला. पण, समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं.
तर तो मुलगा घरात भांडण करुन निघून गेला होता. त्या मुलाला अडवायचं आहे, म्हणून त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. पैसा आणि सत्ता यांचा गैरवापर करत खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करुन मुलाला परत आणलं. म्हणजे पैसा असणाऱ्यांना चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात. कसे रेट कार्पेट टाकलं जातं? पण, एरवी गोरगरीब माणसांच साधं तक्रार अर्ज देखील घेतले जातं नाहीत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.





