Udhayanidhi Stalin : “तामिळनाडू हिंदीची सक्ती कधीही स्वीकारणार नाही”; उदयनिधी स्टॅलिन यांचा केंद्रावर प्रहार
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषिक मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषिक मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तामिळनाडू सरकार त्रिभाषा सूत्र कधीही स्वीकारणार नाही. आम्ही केवळ तामिळ आणि इंग्रजी या द्विभाषा धोरणावरच ठाम राहू, असा स्पष्ट इशारा त्यांनी सोमवारी दिला. तंजावर जिल्ह्यातील तिरुवैयारू येथे निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर केलेल्या टीकेला उदयनिधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. केंद्र सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू करण्याच्या नावाखाली तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारणे म्हणजे हिंदीच्या सक्तीला मुभा देणे होय, जे तामिळ जनतेला कदापि मान्य नाही, असे ते म्हणाले. Udhayanidhi Stalin
तिरुवैयारू मतदारसंघातील डीएमकेचे उमेदवार दुराई चंद्रशेखरन यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उदयनिधी यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. जर तुम्ही २३ एप्रिलच्या निवडणुकीत चंद्रशेखरन यांना ५०,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी केले, तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विजय मिळाल्यास दर महिन्याला तंजावरला भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याचे वचनही त्यांनी दिले.
विरोधकांवर टीका : Udhayanidhi Stalin
अण्णा द्रमुकचे नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी उदयनिधींना अनुभवहीन म्हटल्याबद्दल त्यांनी खोचक टीका केली. नेत्यांच्या पाया पडून सत्ता टिकवण्याचा जो अनुभव पलानीस्वामींकडे आहे, तो अनुभव नक्कीच माझ्याकडे नाही, अशा शब्दांत उदयनिधी यांनी पलटवार केला. २०२१ मध्ये तंजावर जिल्ह्यातील आठपैकी सात जागांवर सत्ताधारी द्रमुक पक्षाने विजय मिळवला होता, यावेळी आठही जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






