Tamasha Artists Attack : कलावंतांची सुरक्षा वाऱ्यावर! तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला; महिला कलाकारांशी गैरवर्तन
Tamasha Artists Attack : बनाईदेवी यात्रेतील घटनेने तमाशा कलावंतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान.

Tamasha Artists Attack – गावोगावी जाऊन लोकांचे मनोरंजन करणारे आणि परंपरा जपणारे तमाशा कलावंत आज सुरक्षित आहेत का? हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेनंतर आता वडगाव सावताळ येथील बनाईदेवी यात्रेत तमाशा पथकावर झालेल्या हल्ल्याने राज्यभरातील कलावंतांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रा आणि उत्सवांच्या काळात मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या काही समाजकंटकांकडून कलावंतांना लक्ष्य केले जात असून, क्षुल्लक वादातून होणारी मारहाण आणि तोडफोड लोककलेसाठी घातक ठरू लागली आहे. या घटनेत केवळ मारहाणच झाली नाही, तर महिला कलाकारांशी गैरवर्तन झाल्याची बाब समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
बाहेरून आलेल्या कलावंतांना कोणी ओळखीचे नसल्याने त्यांना लक्ष्य करणे सोपे जाते, असा एक धोकादायक ट्रेंड सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तमाशा पथकाचे ढोलकी, साऊंड सिस्टीम आणि लाइट्स अशा लाखो रुपयांच्या साहित्याची तोडफोड झाल्याने कलाकारांच्या उदरनिर्वाहावर थेट आघात झाला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजना
तमाशा कलावंतांवरील हल्ले रोखण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त अनिवार्य असणे आवश्यक आहे. तसेच आयोजकांची जबाबदारी निश्चित करून मद्यधुंद व्यक्तींवर तत्काळ कठोर कारवाई व्हायला हवी. महिला कलाकारांसाठी विशेष सुरक्षा उपाय, आणि साहित्याचे नुकसान झाल्यास भरपाईची व्यवस्था करणे काळाची गरज बनली आहे.
लोककलेसमोरचा मोठा प्रश्न
तमाशा, भारूड, गोंधळ आणि कीर्तन यांसारख्या लोककला केवळ मनोरंजन नसून ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहेत. जर या कलेशी जोडलेले कलाकारच असुरक्षित असतील, तर भविष्यात या परंपरा टिकतील का, असा सवाल बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी व्यक्त केला आहे. लोककलेचे संवर्धन करायचे असेल तर कलाकाराला सन्मान आणि सुरक्षा मिळणे अनिवार्य आहे.
“कलावंतांवरचा हल्ला म्हणजे समाजाच्या संस्कृतीवरच हल्ला आहे. गावोगावी फिरून लोककला जिवंत ठेवणाऱ्यांनाच मारहाण करणे हा समाजाचा कलंक आहे.”
– पद्मश्री रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक






