-माधुरी तळवलकर
“लॉकडाऊन इन्सानों पर हैं; प्यार और इन्सानियतपर नहीं’ असा आताच्या काळाला अनुसरून संदेश देणारी “तमस’ ही फिल्म फार चांगल्या तऱ्हेने दिग्दर्शित केली आहे.
फिल्मची सुरुवात होते आणि कळते की, तीन आठवडे सर्व काही बंद. आयटीमध्ये जॉब करणारा एक तरुण मुलगा ही बातमी टीव्हीवर पाहतो आणि हबकतो. भयंकर अस्वस्थ होतो. आठवड्यापूर्वीच तो या शहरात राहायला आलेला आहे. त्याच्या मैत्रिणीचा फोन येतो. अचानक “सगळे बंद’ या कल्पनेने दोघांचीही मनःस्थिती बिघडलेली आहे.
वाद होतात. हा किंचाळतो. फोन फेकून देतो. म्हणतो, असल्या जगात मला जगायचेच नाही. समोरच्या कठड्याकडे भारल्यासारखा चालत जातो आणि कठड्यावर पाय टाकतो. कळते की, हा आता सैरभैर मनःस्थितीत उंच मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या करणार. एवढ्यात त्याला कोणीतरी हाक मारते. हा थांबतो. पुन्हा कोणीतरी खूप आर्जवानं हाक मारते. बघतो, तर त्याच्या घराच्या पातळ भिंतीपलीकडून आवाज येत असतो. तो तिथे जाऊन ऐकतो तर पलीकडून शेजारीण म्हणते, “माझं लहान बाळ आहे. मला मदत कराल का? मला उद्या काही गोष्टी आणून द्याल का?’ तो स्वतःला सावरून “हो’ म्हणतो. थकून झोपून जातो.
सकाळी त्याला पलीकडच्या घरातून भक्तिगीत ऐकू येते. तो भिंतीपाशी जाऊन विचारतो की, “काय मदत हवीय?’ ती म्हणते, “मला बाळ वगैरे काही नाही. काल मी तुम्हाला किंचाळताना ऐकले. जे सुचले ते केले.’ खरे तर तिने एक तरणाताठा जीव वाचवलेला असतो. तो स्वतःचे आवरतो. फोन बघतो तर डेड झालेला. तिला म्हणतो, फोन लावून देणार का? ती पलीकडून त्याच्या कामवालीला फोन लावते. लॉकडाऊनमुळे ती येणार नसते. मग आज खाणार काय? शेजारणीच्या सूचनांनुसार तो करून खातो. मग घरच्यांना फोन लावतो. ते प्रवासातच अडकल्याचे कळते. ही पोलिसातल्या भावाच्या मदतीने त्यांची व्यवस्था करते. हळूहळू दोघांची दोस्ती होते. आपल्याला हा एकच तरुण दिसतो. पलीकडून फक्त आवाज कळतात. दोघे भिंतीपाशी येऊन गप्पा मारतात. आता ह्याची अस्वस्थता पार पळालेली. रिलॅक्स झालेला असतो.
एकदा त्याच्या आईचा फोन येतो, “आपला फोन होतो, तेव्हा तुझ्या शेजारची मुलगी आमच्याशी छान बोलते. लाघवी आहे. तू तिलाच का नाही लग्न करण्यासाठी विचारत?’ यथावकाश ऑफिस सुरू होते. हा खोलीतून बाहेर येतो आणि अचानक त्याची शेजारीण त्याला दिसते; पण… त्या दोघांचा संवाद झाल्यावर आपल्याला एक नवीनच गोष्ट कळते. वेगळा दृष्टिकोन मिळतो. अत्यंत तरल पातळीवरून, सूचकतेने दाखवलेली ही समयोचित फिल्म आवर्जून पाहावी अशी आहे.