Sunetra Pawar : राष्ट्रवादीत ‘पॉवर’ गेम! सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यामागे नेमका कोणाचा हात?
Sunetra Pawar : अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का?

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. आता थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे बिनविरोध सोपवण्यात आली होती.
मात्र, आता सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पटेल- तटकरे विरुद्ध पवार अंतर्गत कलह
परंतु आता सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की त्यांना पाठवण्यास सांगण्यात आले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रफुल पटेल- सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहिला मिळाला होता.
त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात निवडणुक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेला पत्र व्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते, तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादातील वाद समोर आले होते. इतकेच काय तर अद्यापही या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही.
या सर्व घडामोडींवरून सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. Sunetra Pawar
सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
अजित पवारांच्या मृत्यूनंतर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना सादर करण्यात आली होती. त्या नुसार, नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत पक्षाचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडे राहतील, असे स्पष्ट नमूद आहे.
सुधारित संविधानानुसार जर प्रफुल पटेल यांना सर्वाधिकार होते, तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? असा सवाल सिंह यांनी केला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ फेब्रुवारीला बोलावण्यासाठी जे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले, त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती.
२६ फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ती निवड रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नोटिशीत नवीन पदाधिकाऱ्यांची यादीही फेरनिवडणूक होईपर्यंत ग्राह्य धरू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. Sunetra Pawar
हेही वाचा:
Aditya Thackeray : तुकाराम मुंढेंचं नाव घेत आदित्य ठाकरेचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले “भेसळयुक्त…”






