Talegaon Dabhade: तळेगावचा कायापालट होणार! ‘प्रगतीचा नवा आराखडा’ कार्यशाळेचा शुभारंभ; लोकसहभागातून ठरणार शहराचे भविष्य
Talegaon Dabhade: तळेगाव नगर परिषदेत 'तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन - २०३५' कार्यशाळा उत्साहात; पाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमणावर विशेष भर.

Talegaon Dabhade – शहराच्या पुढील दहा वर्षांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५, प्रगतीचा नवा आराखडा या सहभागी धोरणात्मक नियोजन कार्यशाळेचा शुभारंभ शनिवारी (दि. १) नगर परिषद सभागृहात झाला. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील होते.
यावेळी पाणी व्यवस्थापन, अतिक्रमण, शिक्षण, क्रीडा सुविधा आणि लोकसहभाग यावर भर देत शहराच्या दीर्घकालीन विकासाचा आराखडा तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, तळेगावला निसर्गाने पाण्याची मोठी देणगी दिली असली, तरी वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेता पुढील ५० वर्षांच्या गरजा ओळखून पाण्याच्या व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
सध्या १८ ते २० टीएमसी असलेली पाण्याची गरज पुढील काळात ३५ टीएमसीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे नियोजनबद्ध विकास आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी नागरिक, तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून शहराच्या पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. आपलं शहर, आपली जबाबदारी या भावनेतून सर्वांनी सहभागी झाल्यास तळेगावचा शाश्वत विकास शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी प्रास्ताविकात सहभागी नियोजनाच्या माध्यमातून समस्या ओळखून दीर्घकालीन उपाययोजना निश्चित केल्या जाणार असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी व्हिजन २०३५ निश्चिती आणि शहरासमोरील प्रमुख आव्हानांवर दोन सत्रांमध्ये चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर आयसीएचे मास्टर फॅसिलिटेटर, संचालक लॉरेन्स फिलब्रूक, आयसीए इंडियाचे फॅसिलिटेटर संचालक शंकर जाधव आणि अर्चना देशमुख तसेच यतीन घरत,
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, भाजपा गटनेते इंद्रकुमार ओसवाल, राष्ट्रवादी गटनेत्या हेमलता खळदे, तसेच सर्व समित्यांचे सभापती, सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, सामजिक संस्थाचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.






