Talegaon Dabhade : हरित तळेगावासाठी पालिकेचा संकल्प; यंदा ५ हजार वृक्षांची लागवड
Talegaon Dabhade: केवळ वृक्षारोपण न करता लावलेली १०० टक्के झाडे जगविण्याचा संकल्प

तळेगाव दाभाडे – स्वच्छ, सुंदर आणि हरित तळेगाव शहर घडविण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उद्यान विभागाने यंदा शहरात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेली १०० टक्के झाडे जगविण्याचा संकल्प पालिका प्रशासनाने केला असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.
स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, हरित तळेगाव या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत आतापर्यंत शहरातील तळ्याच्या काठावर सुमारे दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. या मोहिमेत बहावा, ताम्हण, कडुलिंब यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींचा समावेश करण्यात आला असून उर्वरित तीन हजार झाडांची लागवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती विशाल मिंड यांनी दिली.
माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत नगर परिषदेला मिळालेल्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या बक्षीस निधीसह नगर परिषदेच्या अंदाजपत्रकातील ५० लाख रुपयांच्या तरतुदीतून वृक्षारोपण, संवर्धन, देखभाल, दुरुस्ती, वृक्ष खरेदी आणि मजुरांच्या वेतनावर खर्च करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि उद्यान विभाग प्रमुख विशाल मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
यावर्षी नगर परिषद १९० रुपये दराने प्रत्येकी झाडाची खरेदी करत असून प्रत्येक झाडासाठी सुमारे ६० रुपयांचे खतही उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकूण ५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून त्यांची देखभाल, संवर्धन आणि निगा राखण्याची जबाबदारी तीन वर्षांसाठी संबंधित ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे. – विशाल मिंड, उद्यान विभाग प्रमुख, तळेगाव दाभाडे नगर परिषद




