Pune District : ‘वाय जंक्शन’ पूल वाहतुकीसाठी पूर्ववत
Pune District : इंद्रायणीच्या धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे ६ ते ९ जुलैदरम्यान सलग तीन दिवस आळंदीतील सर्व चारही पूल पाण्याखाली गेले होते.

आळंदी : यंदा उशिरा दाखल झालेल्या आणि मुसळधार बरसलेल्या पावसाने पुणे, मुंबईप्रमाणेच आळंदीलाही झोडपून काढले. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यानच इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आळंदीकडे लागले होते.
जून महिना कोरडा गेल्याने आणि ‘एल निनो’च्या धक्क्याने नागरिक चिंतेत असतानाच, जुलैच्या सुरुवातीला पावसाने जोरदार पुनरागमन केले. इंद्रायणीच्या धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे ६ ते ९ जुलैदरम्यान सलग तीन दिवस आळंदीतील सर्व चारही पूल पाण्याखाली गेले होते.
कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. त्यामुळे नदीकाठच्या परिसराचे आणि पुलांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या प्रवाहात पुलांचे लोखंडी कठडे वाहून गेल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पुण्याकडून आळंदीकडे जाणाऱ्या ‘वाय जंक्शन’जवळील पुलाचे कठडे फुटल्याने मोठा फटका बसला व हा पूल आठवडाभर बंद ठेवावा लागला.
हा मुख्य पूल बंद असल्याने चाकण आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आळंदी शहरातून, नगरपरिषदेसमोरील एकाच नवीन पुलावरून वळवण्यात आली होती. चारपैकी केवळ एकच पूल सुरू असल्याने तेथून दुहेरी वाहतूक सुरू होती. परिणामी, आळंदी शहर व प्रवेशद्वारांवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
कठड्यांची दुरुस्ती; मार्ग खुला
वाय जंक्शन ते चाकण चौक जोडणाऱ्या पुलाचे लोखंडी कठडे आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आले आहेत. दुरुस्तीनंतर हा पूल शुक्रवारी (दि. १७) पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आठवडाभराच्या कोंडीतून स्थानिक नागरिक, व्यापारी, भाविक आणि वारकऱ्यांची मोठी सुटका झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने दाखवलेली तत्परता व केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्ग लवकरात लवकर मोकळा झाल्याने नागरिकांनी व वारकऱ्यांनी संबंधित सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत.





