Talegaon Dabhade : नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोहळा
Talegaon Dabhade : कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था

तळेगाव दाभाडे – शहरातील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचा भूमिपूजन सोहळा आज (दि. १५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांकडून देखील नियोजन करण्यात आले आहे.
भूमिपूजन सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, व्यासपीठाची उभारणी, भव्य मंडप, पाहुण्यांच्या स्वागताची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करणयात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राज्यातील सहकार मंत्र्यांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री संजय भेगडे यांनी दिली.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी गेल्या १५ वर्षांपासून बंद होती. आता कंपनीच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू होत असल्याने या भूमिपूजन सोहळ्याकडे कंपनीतील आजी-माजी कामगारांचे लक्ष लागले आहे. कंपनीत काम केलेले अनेक कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या पुनर्निर्माणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





