Bhakti-Shakti Chowk: टोलवसुली जोरात, महामार्ग मात्र अंधारात; देहूरोड ते भक्ती-शक्ती चौकादरम्यान पथदिवे बंद
वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

– रामकुमार आगरवाल
देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौक ते निगडी येथील भक्ती-शक्ती चौकादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर तसेच उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत, तर काही दिवे लुकलुकत असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरत आहे.
दिवाळीपूर्वीपासून म्हणजेच गेल्या पंधरवड्यापासून ही परिस्थिती कायम असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. टोलची वसुली नियमित सुरू असताना महामार्गाच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे-मुंबई महामार्ग हा शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने हलकी आणि अवजड वाहने धावतात. मात्र, देहूरोड सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती चौकादरम्यान अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री वाहन चालवताना अडचणी येत आहेत. उड्डाणपुलावरील काही दिवे बंद, तर काही दिवे लुकलुकत असल्याने प्रकाश अपुरा पडतो.
महामार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्याची दिशा आणि कडे ओळखणे अवघड होत आहे. त्यातच रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या आणि झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा पुसट झाल्या आहेत.
काही ठिकाणी या खुणा पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खुणा स्पष्ट नसल्याने वाहनांच्या हालचालींमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीकडून महामार्गाची नियमित देखभाल आणि आवश्यक सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. मात्र, बंद पथदिव्यांची दुरुस्ती, रिफ्लेक्टर बसविणे, पांढऱ्या पट्ट्यांचे नूतनीकरण, झेब्रा क्रॉसिंग रंगविणे आणि रस्त्यांची डागडुजी याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता आणि वाढलेल्या झाडाझुडपांची छाटणीही नियमितपणे होत नसल्याची तक्रार आहे.
लोकप्रतिनिधींचे ताफे जातात, तरीही समस्या कायम
विशेष म्हणजे, याच मार्गावरून राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधींचे वाहनांचे ताफे नियमितपणे ये-जा करतात. असे असतानाही महामार्गावरील बंद पथदिवे, पुसट झालेल्या खुणा आणि अन्य समस्यांची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवणारे संबंधित अधिकारी नेमकी कोणती कार्यवाही करतात, असा सवालही उपस्थित होत आहे.
स्वच्छतागृहांचीही वानवा
सोमाटणे टोलनाक्यापासून निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंतच्या महामार्गावर महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा होते.
मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असतानाही प्रवाशांसाठी मूलभूत स्वच्छतागृहाची सुविधा नसणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Bhavaninagar : निरा नदीच्या पाण्यासाठी तीन साखर कारखाने एकवटले





