शासकीय कामामुळे महिनाभर तलाठी कार्यालय बंद

तळेगाव ढमढेरे येथील सावळा गोंधळ : पंचनाम्यामुळे शेतकरी ताटकळले
तळेगाव ढमढेरे (वार्ताहर) – तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय गेल्या महिनाभरापासून बंद आहे. नागरिकांची गैरसोय तसेच यातून अडवणूक होत आहे. शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांनी शासकीय कामानिमित्त तलाठी आणि मंडलाधिकारी बाहेर असल्याचे संगितले आहे.
अवकाळी पावसामुळे येथील शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत, अशी मागणी होत असताना तलाठी कार्यालय गेल्या महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पंचनाम्याव्यतिरिक्त बॅंकेची कामे खोळंबली आहेत.निवडणुकी पूर्वीपासून कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहेत. परंतु, कामगार तलाठी भेटेना, अशी स्थिती आहे. तळेगाव ढमढेरे हे सर्वात मोठे गाव, शेजारीच दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते.
गावामध्ये प्रत्येकवेळा तलाठी आणि मंडलाधिकारी यांची गरज भासते. यानिमित्त नागरिकांना विविध कामांसाठी सातबारे विविध प्रकारचे दाखले गरजेचे असतात. यासाठी नागरिक कामगार तलाठी यांना फोन केल्यास फोन उचलत नसल्याच्या तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचला आहे. पूर्वीचे मंडलाधिकारी, कामगार तलाठ्यांची बदली होऊन गेल्यापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दाखला किंवा सातबारे मिळाले नसल्याचा आरोप तळेगाव ढमढेरेचे माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी केला आहे. याबाबत नागरिकांच्या तोंडी तक्रारी असून त्यामध्ये कामगार तलाठी यांनी लवकर कार्यालयात हजर होऊन नागरिकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
निवडणुकीपासूनच शासकीय कामासाठी तलाठी आणि मंडलाधिकारी हे शेती नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांसाठीच्या कामात व्यस्त आहेत. सर्व कर्मचारी अधिकारी कामानिमित्त बाहेर असतात. या कारणामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
– लैला शेख, तहसीलदार, शिरूर.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नोंदविण्यासाठी शेतकरी कार्यालयात तलाठ्यांची भेटच होत नाही. मग, शासकीय कामानिमित पंचनामे कोणाचे करता. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला शासकीय अधिकारी जबाबदार आहेत.
– गणेश तोडकर, माजी उपसरपंच, तळेगाव ढमढेरे.





