Shirur News : सिस्पे घोटाळ्यात शिरूर तालुक्यातील तलाठ्याला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
Shirur News : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१, रा. श्रीगोंदा) याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Shirur News : बहुचर्चित सिस्पे घोटाळ्यातील फरार संशयित शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१, रा. श्रीगोंदा) याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. (Shirur News)
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने रोडे याला २७ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shirur News)
सिस्पे घोटाळ्याशी संबंधित विविध गुन्ह्यांचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणातील पसार संशयितांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेची मदत मागितली होती. (Shirur News)
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकात पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते आणि फुरकान शेख यांचा समावेश होता. (Shirur News)
गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) संशयितांचा शोध सुरू असताना दशरथ रोडे हा श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून रोडे याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. (Shirur News)
दशरथ रोडे हा शासकीय सेवेत तलाठी म्हणून कार्यरत असतानाच सिस्पे कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने अनेक नागरिकांना या कंपनीत पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले असावे, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. तसेच रोडे याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तीही कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Shirur News)
रोडे याने कंपनीसाठी नेमके कोणते काम केले, त्याचे गुंतवणूकदारांशी काय संबंध होते आणि या प्रकरणात त्याचा संभाव्य सहभाग किती आहे, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. (Shirur News)
पोलीस कोठडीच्या कालावधीत या बाबींची चौकशी केली जाणार आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे कार्यरत असलेल्या या तलाठ्याला अटक केल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Shirur News)





