Shirur Crime News : तीन घटनांमुळे शिरूरमध्ये खळबळ! पोलिसांसमोर आव्हान; असं घडलं तरी काय?
Shirur Crime News : या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता मुलीचा रंग गोरा, बांधा सडपातळ, केस काळे व लांब, तर डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लूज पॅन्ट परिधान केली होती.

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसह २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याच्या दोन घटना समोर आल्या असून, दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी, उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या अंदाजे ५० वर्षीय अनोळखी पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही. या तीन घटनांमुळे शिरूर परिसरात खळबळ उडाली असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि अनोळखी मृताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शिरूर शहर परिसरात राहणारी १४ वर्षे ८ महिने वयाची अल्पवयीन मुलगी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोरून बेपत्ता झाली. तिच्या आईने याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता मुलीचा रंग गोरा, बांधा सडपातळ, केस काळे व लांब, तर डोळे काळे आहेत. बेपत्ता होताना तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लूज पॅन्ट परिधान केली होती. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत रांजणगाव सांडस येथील बाळुबाईचा मळा परिसरात राहणारा ओंकार ज्ञानदेव रणदिवे (वय २५, व्यवसाय शेती) हा तरुण ७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता रांजणगाव येथून इस्त्रीचे कपडे घेऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो न सापडल्याने त्याचे वडील ज्ञानदेव दशरथ रणदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
अज्ञात व्यक्तीने ओंकार याला फूस लावून किंवा अन्य प्रकारे त्याच्या इच्छेविरुद्ध नेऊन गुप्त ठिकाणी बेकायदेशीररीत्या ठेवले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२२ वाजता शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
तिसऱ्या प्रकरणात, अंदाजे ५० वर्षे वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित पुरुषाला शिरूर ग्रामीण रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेद्वारे ५ ऑक्टोबर रोजी रात्री १२.१६ वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये उपचार सुरू असताना पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, ससून रुग्णालयातील त्याचा नोंदणी क्रमांक MIC No. 29960/26 असा आहे. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अमर क्रमांक १६६/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केनेकर करीत आहेत.
शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासह अनोळखी मृताची ओळख पटविण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. बेपत्ता मुलगी किंवा तरुणाबाबत, तसेच अनोळखी मृत पुरुषाबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.





