बीबीए, बीसीएला प्रवेश घेताय..?

पुणे – यंदापासून बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर न होता राज्य सीईटी सेलमार्फत होत आहे. मात्र, “एआयसीटीई’ची मान्यता न घेता काही महाविद्यालये बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमांस प्रवेश देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित बहुतांश महाविद्यालयांनी बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमांसााठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घेतली आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलद्वारे होणार आहेत. मात्र, “एआयसीटीई’कडून अभ्यासक्रमांची मान्यता घेतली नाही, अशा महाविद्यालयातील बीबीए, बीसीएचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न आहे.
या दोन अभ्यासक्रमांची मान्यता न घेतलेल्या महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदापासून अभ्यासक्रमांच्या नावात बदल केले आहे. विद्यापीठाने बीबीए, बीबीए (आयबी), बीबीए (सीए) आणि बीसीए या अभ्यासक्रमांचे नामकरण केले आहे. पण, तरीही काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
महाविद्यालये माहिती लपवतात
पुणे विद्यापीठाने बीबीए व बीसीए अभ्यासकमांचे नावे यावर्षीपासून बदलली आहेत. त्याबाबत पालक व विद्यार्थी अनभिज्ञ असतात. महाविद्यालयेही बीबीए व बीसीए अभ्यासकम म्हणून प्रवेश देतात. पण, या अभ्यासक्रमांची नावे वेगळी आहेत, ही बाब सांगत नाहीत. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांना आपली फसवूणक झाल्याचे दिसून येते.
जुने नाव : नवीन नाव
बीबीए : बॅचलर ऑफ कॉमर्स बिझनेस मॅनेजमेंट-बीकॉम (बीएम.)
बीबीए (आयबी) : बॅचलर ऑफ कॉमर्स इन इंटरनॅशनल बिझनेस – बी.कॉम. (आयबी)
बीबीए (सीए) : बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स- बी.कॉम. (सीए)
बीसीए : बी.एस्सी. (काॅम्प्युटर अॅप्लिकेशन्स)
– अभ्यासक्रमाला “एआयसीटीई’ची मान्यता आवश्यक
– प्रवेश प्रक्रिया यंदापासून राज्य सीईटी सेलमार्फत
– काही महाविद्यालयांकडून माहिती लपवली जाण्याची शक्यता
– पुणे विद्यापीठानेही बदलले दोन्ही अभ्यासक्रमांचे नाव
“बीबीए व बीसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना संबंधित महाविद्यालयांना “एआयसीटीई’ची मान्यता आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थी अडचणीत येऊ शकतील, अथवा फसणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहानिशा करुन प्रवेश घ्यावा.” – प्रा. शामकांत देशमुख, उपप्राचार्य, माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
“महाविद्यालय व संस्थांनी बीबीए व बीसीए अभ्यासकमांसाठी मान्यता घेतली आहे, की याची माहिती मागविण्यात येत आहे. मात्र, या अभ्यासक्रमांवरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यासाठी येत्या सोमवारी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केले जातील. त्यानंतर एआयटीसीटीई मान्यताप्राप्त संस्थांची यादीही प्रसिद्ध केली जाईल.” – डाॅ. पराग काळकर, प्र-कुलगुरु
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान
महाविद्यालयांनी बीबीए व बीसीएचे बदललेल्या अभ्यासक्रमास प्रवेश देत असल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. रितसर सीईटीद्वारे झालेल्या प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. परंतु विद्यापीठाने बदललेल्या अभ्यासक्रमांस प्रवेश घेतल्यास त्यास समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल का, या विषयी साशंकता आहे.


