खेळणं समजून खरे पिस्तुल घेऊन गेला शाळेत ! दिल्लीतील शाळेत घडलेला प्रकार

नवी दिल्ली – दहा वर्षाचा एक मुलगा खेळणं समजून खरे पिस्तुल घेऊन शाळेत गेल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर शाळेत मोठीच धांदल उडाली. पण पिस्तुलात गोळ्याच नव्हत्या. त्यामुळे कोणतेही मोठे संकट उद्भवले नाही. दिल्लीच्या नजफगढमधील एका शाळेत हा प्रकार घडला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दीपक विहार परिसरातील एका खासगी शाळेत ही घटना घडली. मुलाच्या स्कूल बॅगमध्ये पिस्तुल आढळून आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्याच्या आईला तातडीने शाळेत बोलावले. तोपर्यंत तिथे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी हे पिस्तुल ताब्यात घेतले. ते त्याच्या वडिलांचे परवाना असलेले पिस्तुल आहे. याबाबत मुलाच्या आईने सांगितले की हे पिस्तुल आपल्या पतीचे आहे. त्यांच्याकडे त्याचा परवानाही आहे, तिच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.
त्यामुळे ते पिस्तूल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यासाठी बाहेर ठेवले होते. हे एक खेळणे असावे असे समजून मुलाने हे पिस्तुल आपल्या दप्तरातून शाळेत नेले. पोलिसांनी पिस्तूलच्या परवान्याची पडताळणी केली, ते वैध असल्याचे आढळले. दरम्यान, या प्रकरणात कोणताही दखलपात्र गुन्हा केलेला नाही असे ठरवले.





