दखल : माती वाचवा; शहरे वाचवा
‘माती वाचवा’ हा (Save Soil) विषय आता केवळ शेतीपुरता मर्यादित न ठेवता शहरांच्या भविष्यातील नियोजनाचा केंद्रबिंदू बनविण्याची गरज आहे.

– योगेश यादव
Save Soil : ‘माती वाचवा’ हा (Save Soil) विषय आता केवळ शेतीपुरता मर्यादित न ठेवता शहरांच्या भविष्यातील नियोजनाचा केंद्रबिंदू बनविण्याची गरज आहे.
शहरांचा विकास म्हणजे केवळ उंच इमारती, रुंद रस्ते, मोठे पूल आणि आधुनिक सुविधा नव्हेत. शहर खर्या अर्थाने विकसित तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तेथील हवा स्वच्छ, पाणी सुरक्षित, हिरवळ मुबलक आणि माती जिवंत व निरोगी असेल. मात्र, झपाट्याने होणारे शहरीकरण, वाढते काँक्रीटीकरण, कचर्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि रासायनिक प्रदूषण यामुळे शहरांच्या जमिनीचे आरोग्य गंभीरपणे धोक्यात आले आहे.
माती (Save Soil) ही शाश्वत विकासाचा मूलभूत आधार आहे. ती केवळ झाडांना आधार देणारे माध्यम नसून पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरणास मदत करणे, सूक्ष्मजीव व जैवविविधता टिकवणे, वनस्पतींची वाढ आणि स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणे यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका असते. शहरांमध्ये मोकळ्या जमिनीचे प्रमाण कमी होत असताना आणि काँक्रीटचे क्षेत्र वाढत असताना या नैसर्गिक प्रक्रियांवर मोठा परिणाम होत आहे.
शहरी हिरवळ आणि सेंद्रिय कचरा
शहरातील मोकळ्या जागा, सोसायट्यांचे परिसर, शाळा-महाविद्यालयांची आवारे, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी नियोजनपूर्वक हिरवळ वाढविणे आवश्यक आहे. स्थानिक प्रजातींची झाडे, फुलझाडे, भाजीपाला बागा आणि सामुदायिक उद्याने यामुळे शहराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते.
याचबरोबर ओला कचरा हा शहरासाठी समस्या न ठरता मातीसाठी (Save Soil) उपयुक्त संसाधन ठरू शकतो. घरातील स्वयंपाकघरातील कचरा, बाजारातील भाजीपाला अवशेष तसेच बागेतील पालापाचोळा यांचे योग्य वर्गीकरण करून स्थानिक पातळीवर कंपोस्ट तयार करता येते. हे कंपोस्ट उद्याने, वृक्षलागवड आणि घरगुती बागांसाठी वापरल्यास कचरा व्यवस्थापन आणि माती संवर्धन या दोन्ही प्रश्नांवर एकाच वेळी उपाय करता येईल.
मातीच्या आरोग्याची गुरूकिल्ली
सेंद्रिय पदार्थ मातीच्या आरोग्याची गुरूकिल्ली आहे. शहरी मातीची गुणवत्ता टिकविण्यासाठी कंपोस्ट, गांडूळखत, जैविक खते आणि इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, सूक्ष्मजीवांचे संवर्धन करणे आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी सेंद्रिय पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात.
आज शहरांमधील कचरा दूर नेण्यासाठी मोठा खर्च केला जातो. त्याऐवजी ओला कचरा स्थानिक पातळीवरच प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली, तर वाहतूक आणि विल्हेवाटीचा खर्च कमी होण्याबरोबरच शहरी हिरवळीसाठी नैसर्गिक खत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ‘कचरा ते संपत्ती’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे.
काँक्रिटीकरणाला पर्याय शोधण्याची वेळ
शहरातील प्रत्येक मोकळी जागा काँक्रीटने झाकण्याची प्रवृत्ती भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. जमिनीवर काँक्रीटचे आवरण वाढले की पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची नैसर्गिक क्षमता कमी होते. परिणामी भूजल पुनर्भरणावर परिणाम होतो आणि पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुडुंब भरणे तसेच शहरी पूर यांसारख्या समस्या वाढू शकतात.
त्यामुळे शहर नियोजनात पारगम्य पृष्ठभाग, रेन गार्डन, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या व्यवस्था, जलसंधारण क्षेत्रे आणि हरित पट्टे यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासकामे करताना मातीचा नैसर्गिक श्वास बंद होणार नाही, याची काळजी घेणे ही नियोजन यंत्रणेबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे.
माती वाचवा; अन्यथा शहरे धोक्यात
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मातीचे संवर्धन अधिक महत्त्वाचे झाले आहे. हिरवळ कमी होऊन काँक्रिटीकरण वाढल्यास शहरांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उलट, मोकळी माती, झाडे आणि हरित क्षेत्रे टिकवून ठेवली तर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास तसेच स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. म्हणूनच भविष्यातील शहरांच्या विकासाचे मूल्यमापन केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांच्या आधारे न करता जमिनीचे आरोग्य, हरित क्षेत्रांचे प्रमाण, पाणी साठवण व पुनर्भरण आणि जैवविविधता यांच्याही आधारे करण्याची वेळ आली आहे.
हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज
‘हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज’ अर्थात ‘निरोगी माती-निरोगी शहरे’ ही संकल्पना केवळ पर्यावरणपूरक घोषणा न राहता शहर विकासाची दिशा बनली पाहिजे. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, स्वयं-सहायता गट आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
प्रत्येक शाळेत ‘माझी शाळा-माझी माती’ हा उपक्रम राबविता येईल. विद्यार्थ्यांना कंपोस्ट निर्मिती, वृक्षसंवर्धन, मातीची गुणवत्ता, जैवविविधता आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या पद्धती यांचे प्रात्यक्षिक ज्ञान देता येईल. महाविद्यालयांनी माती परीक्षण, शहरी शेती, जैविक कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेवर अभ्यास व प्रकल्प हाती घ्यावेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक प्रभागात सामुदायिक कंपोस्टिंग केंद्रे, शहरी बागा, हरित पट्टे आणि माती संवर्धन प्रकल्प उभारण्याचा विचार करावा. स्वयं-सहायता गटांना कंपोस्ट, गांडूळखत आणि सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण दिल्यास पर्यावरण संवर्धनाबरोबरच स्थानिक रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात.
नागरिकांचा सहभागच खरा बदल घडवेल
शहर बदलण्याची जबाबदारी केवळ शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही. प्रत्येक नागरिकाची भूमिका त्यामध्ये तितकीच महत्त्वाची आहे. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, शक्य असल्यास घरच्या घरी कंपोस्ट तयार करणे, झाडांचे संवर्धन करणे, अनावश्यक काँक्रिटीकरण टाळणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करणे या छोट्या कृतींचा सामूहिक परिणाम मोठा असतो.
प्रत्येक नागरिकाने स्वतःला ‘मातीचा संरक्षक’ मानले, तर शहरांच्या विकासाची दिशा निश्चितच बदलू शकते. कारण मातीचे आरोग्य चांगले असेल तरच हिरवळ, पाणी, जैवविविधता आणि मानवी जीवनमान यांचे आरोग्य टिकवता येईल.
स्मार्ट सिटीपेक्षा ‘हेल्दी सिटी’
आपण पुढच्या पिढीला केवळ ‘स्मार्ट सिटी’ देणार आहोत की निरोगी, हिरवीगार आणि शाश्वत शहरे देणार आहोत, हा आजचा मूलभूत (Save Soil) प्रश्न आहे. स्मार्ट शहराची खरी ओळख केवळ इमारतींच्या उंचीत किंवा आधुनिक तंत्रज्ञानात नसून निरोगी माती, सुरक्षित पाणी, मुबलक हिरवळ, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाबाबत जागरूक नागरिक यामध्ये असली पाहिजे.






