पिंपरी | त्या ठेकेदाराकडून काम काढून घ्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न विचारला. पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधत कंत्राटदाराकडून काम काढण्याची मागणी केली. त्यावर कंत्राटदार रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असलेले या रस्त्याचे काम रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
या रस्त्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटही घेतली. त्यानंतर खासदार बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न विचारला. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जुना प्रस्ताव रद्द करुन नवीन प्रस्ताव रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आणला जाणार आहे का, जुन्या कंत्राटदाराकडून काम काढावे अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
त्यावर उत्तर देताना रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघातून जाणारा हा बायपास रोड रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे आहे. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे.
त्यामुळे सहमतीने रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असलेले काम रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन डीपीआर तयार करुन नागरिकांना येणार्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.





