“आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून एक पैसा घेतला नाही” – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावरून आपल्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आयात लॉबीवर जोरदार हल्ला चढवला. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःची तुलना “फळांनी भरलेल्या झाडाशी” करत म्हटले की, “ज्या झाडाला फळे येतात, त्यालाच दगड मारले जातात. मी अशा टीकेला उत्तर देत नाही, कारण त्यामुळे तीच बातमी बनते.”
गडकरी यांनी स्पष्ट केले की, त्यांचे धोरण शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे, प्रदूषण कमी करणे आणि इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहे. या धोरणामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या शक्तिशाली लॉबीचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले आहेत. “कच्च्या तेलाच्या आयातीतून २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. माझ्या निर्णयामुळे काही लोकांचे व्यवसाय प्रभावित झाले आणि त्यांनी पैसे देऊन माझ्याविरोधात खोट्या बातम्या पसरवण्यास सुरुवात केली,” असे गडकरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आजपर्यंत एकाही ठेकेदाराकडून एक पैसा घेतला नाही, त्यामुळे ठेकेदार मला घाबरतात.” राजकारणात असे खोटे आरोप होणे सामान्य असल्याचे सांगत त्यांनी आपण या आरोपांना भिक घालणार नसून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ठासून सांगितले. “लोकांना सत्य माहित आहे. मी यापूर्वीही अशा परिस्थितीला सामोरे गेलो आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सीआयएएन अॅग्रोच्या वाढीवरून चर्चा –
गडकरी यांचे हे वक्तव्य त्यांचा मुलगा निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सीआयएएन अॅग्रो इंडस्ट्रीज या इथेनॉल उत्पादनाशी संबंधित कंपनीच्या तीव्र आर्थिक वाढीच्या पार्श्वभूमीवर आले आहे. कंपनीचा महसूल २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत १७.४७ कोटी रुपये होता, तो एप्रिल-जून २०२५ मध्ये ५१०.८ कोटी रुपयांवर पोहोचला. याच कालावधीत कंपनीचा नफा जवळपास शून्यावरून ५२ कोटींवर गेला. कंपनीच्या शेअरच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षी १७२ रुपये असलेला शेअर आता २,०२३ रुपये झाला आहे.
विश्लेषकांच्या मते, ही वाढ केवळ इथेनॉल विक्रीमुळे नाही, तर इतर उत्पन्न आणि नव्या व्यवसायांमुळेही झाली आहे. गडकरी यांनी या टीकेला दुजोरा देताना आपले धोरण देशहितासाठी असल्याचे अधोरेखित केले. “लोकांना सत्य माहित आहे”
गडकरी यांनी आपल्या धोरणांचा बचाव करताना शेतकऱ्यांचे हित, पर्यावरण संरक्षण आणि देशाची ऊर्जा स्वयंपूर्णता यावर भर दिला. “आम्ही शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवत आहोत आणि प्रदूषण कमी करत आहोत. यामुळे काही लोक नाराज असतील, पण माझे काम सुरू राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, गडकरी यांच्या धोरणांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायांचा संबंध जोडला जाण्याची शक्यता आहे.





