ठेकेदाराचा अजब कारभार; भर पावसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी

निमोणे : करडे-कारेगाव रस्त्याचे सहा महीन्यांपूर्वी झालेले काम निकृष्ट दर्जामुळे उखडले असून, ठिकठिकाणी खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. आज (दि. २९) दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असताना ठेकेदाराने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एवढ्या दिवसांत ठेकेदार काय झोपा काढत होता का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
करडे-कारेगाव रस्ता हा रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त येणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सहा महीन्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या सहा महीन्यांतच रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासतात की केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री कारभार करतात, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली, तरी मुरूम, खडी आणि डांबर यांचा निकृष्ट दर्जा यामुळे अनेक रस्ते सहा महीन्यांतच उखडले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या असूनही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी साटलोट आहे का, अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
भर पावसात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन जबाबदार ठेकेदारांवर कारवाई होणार की पुन्हा एकदा कागदोपत्री कारभार करून प्रकरण दाबले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





