Pimpri News : ९० कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात! बोनस न देणाऱ्या ठेकेदाराला मनसेचा २४ तासांचा अल्टिमेटम

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिकेच्या एका ठेकेदाराने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी संपली तरीही बोनस न दिल्याचा आक्षेप करत मनसेने संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील स्मशानभूमीमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ९० कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस ठेकेदाराने दिवाळी होऊन चार दिवस उलटले तरीही दिलेला नाही. स्मशानभूमीतील कर्मचारी अत्यंत बिकट परिस्थितीत महापालिकेच्या सेवेत कार्यरत असतात.
त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणे, तेही दिवाळीसारख्या सणाच्या वेळी त्यांचा बोनस अडवून ठेवणे, हा ‘कंत्राटी कामगार (नियमन आणि समाप्ती) अधिनियम, १९७०’ आणि ‘बोनस प्रदान अधिनियम, १९६५’ यांसारख्या अत्यावश्यक कामगार कायद्यांचे थेट उल्लंघन आहे. मनसेने मागणी केली आहे की, २४ तासांच्या आत स्मशानभूमीतील सर्व ९० कर्मचाऱ्यांचा थकीत दिवाळी बोनस तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. ठेकेदारावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी.
त्यांचा ठेका रद्द होऊन सहा महिने झाले आहेत आपल्याकडे त्यांच्या काही रक्कम बाकी आहे ती अदा करू नये जोपर्यंत कामगारांचा बोनस तसेच इतर सर्व बाबी ठेकेदार पूर्ण करून दिल्याशिवाय त्यांना उर्वरित रक्कम अदा करू नये. २४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.यावेळी मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली.
अधिकाऱ्यांचे आश्वासन..
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील १३ स्मशानभूमीतील प्रमुख कर्मचारी बैठकीला उपस्िथत होते. आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना तुमचा दिवाळी बोनस 100 टक्के दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे मनसेचे याचे आश्वासन दिले प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर लवकरच बोनस जमा होईल असे मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी सांगितले.





