रेशनसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवत होती वृद्ध महिला; नायब तहसीलदारांनी केलं असं काही…

पाचगणी (प्रतिनीधी) – आपल्याकडे आजही सरकारी कार्यालयात काम म्हंटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. सरकारी कार्यालय म्हंटलं की शिपायापासून लिपिकापर्यंत सगळेच साहेब! आणि त्यातल्या त्यात खऱ्या-खुऱ्या साहेबांचा थाट तर विचारायलाच नको. सरकारी कार्यालयातील अनुभवावरून आपल्याकडं ‘सरकारी काम आणि दोन महिने थांब’ ही म्हणच प्रचलित झाली आहे. मात्र नव्या पिढीतील काही होतकरू अधिकारी आता सरकारी कार्यालयांच्या कासवगतीला आणि अधिकाऱ्यांच्या ‘बाबू’ प्रतिमेला छेद देतायेत. याचाच प्रत्यय जावळी तहसीलदार कार्यालयात आला.
जावळीचे नायब तहसीलदार मयुर राऊत यांची एक कृती सध्या कौतुकास पात्र ठरतेय. त्याच झालं असं की, एक वयोवृद्ध महिला रेशन संदर्भात फार दिवसांपासून अडचण होत असल्याचं गाऱ्हाणं घेऊन तहसीलदार कार्यालयात आलेली. हातात अर्ज होता पण ना लिहता येतंय, ना वाचता काय करणार? कोणी मदत करेल या आशेनं ती मायमाऊली बाकड्यावर बसून होती. ही बाब नायब तहसीलदार मयूर राऊत यांच्या नजरेस पडताच त्यांच्यातील माणूस जागा झाला.
अन् मग काय… तहसीलदाराची खुर्ची सोडून राऊत या वृद्धेच्या मदतीस पोहोचले. तिच्या समस्येची आपुलकीने विचारपूस केली, तिचा अर्ज भरून दिला अन् रेशन संदर्भात होणारी अडचण सोडवण्याचाही शब्द दिला. अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंब्रे झिजवूनही प्रश्न मार्गी न लागलेल्या या तालुक्यातील बिभवी गावच्या वृद्धेचा प्रश्न अधिकाऱ्याच्या एका कृतीने सुटलाय.
या महिलेला रेशन मिळण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी त्वरित दूर व्हाव्या यासाठी नायब तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. खरंतर सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठीच ही यंत्रणा उभी असते. मात्र काही सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. अशातच, नायब तहसीलदार मयूर राऊत यांनी कृतीतून आपली नेमणूक सामान्य जनतेच्या सेवेसाठीच करण्यात आलं असल्याचं दाखवून देत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.





