T20 World Cup 2022 : स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपूर्वी संघ जाहीर करावे लागणार

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणार असून त्यासाठी सहभागी देशांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत संघ जाहिर करावे लागणार आहेत. भारताबाबत बोलायचे झाले तर त्यापूर्वीच्या कालावधीत होत असलेल्या सर्व मालिकांमधून खेळाडू निवडून त्यांची अंतिम यादी आयसीसीकडे पाठवण्यासाठी निवड समितीला मोठी कसरत करावी लागणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेसाठी सप्टेंबरपूर्वी होत असलेल्या विविध मालिकांमधून संघबांधणी करणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला या स्पर्धेसाठी संघ निवडताना पुढील चार मालिकांमधून खेळाडूंची शॉर्टलिस्ट करावी लागणार आहे. भारतीय संघ जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चार मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकांमध्ये आता कोणते प्रयोग केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आठ महिन्यांत बदलले सहा कर्णधार
बीसीसीआयने निवड समितीच्या सहभागासह गेल्या आठ महिन्यांत तब्बल सहा कर्णधार बदलले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत व हार्दिक पंड्या असे सहा कर्णधार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यांपैकी राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र, येत्या काही दिवसांत तो फिट ठरून संघात पुनरागमन करेल.
तसेच रोहित व कोहलीने काही मालिकांमधून विश्रांती घेतली असल्याने नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, आता सुरू होत असलेल्या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या असल्याने सर्व प्रमुख खेळाडू संघात परतत आहेत. त्यामुळे रोहितच नेतृत्व करेल मात्र, त्याला दुखापत झाली किंवा त्याने पुढील काही मालिकांतूनही विश्रांती घेतली तर नवा कर्णधार शोधण्याचे काम पुन्हा निवड समितीला डोकेदुखी ठरणार आहे.





