Gautam Gambhir : T20 वर्ल्ड कप जिंकण्याआधीच गौतम गंभीरला ‘या’ संघाकडून मोठी ऑफर; ‘ट्रिपल पोस्ट’ मिळणार!
टी-20 विश्व कप २०२६ चालू असताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना आयपीएलमध्ये परतण्याची एक मोठी आणि आकर्षक ऑफर मिळाली आहे.

Gautam Gambhir : टी-20 विश्व कप २०२६ चालू असताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना आयपीएलमध्ये परतण्याची एक मोठी आणि आकर्षक ऑफर मिळाली आहे. ही ऑफर राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायझीकडून आली असून, क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
गंभीर (Gautam Gambhir) यांनी २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला आयपीएल चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, पण यावेळी राजस्थान रॉयल्सकडे जाण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्सच्या मालकीमध्ये सध्या बदल होत आहे. फ्रेंचायझीच्या तीन नव्या शेअरहोल्डर्सपैकी एकाने गौतम गंभीर यांना एक अतिशय आकर्षक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात त्यांना फक्त प्रशिक्षक किंवा मेंटॉरची भूमिका नाही, तर पार्टनर, मेंटॉर आणि सीईओ अशा तीन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय, राजस्थान रॉयल्समध्ये २ ते ३ टक्के हिस्सेदारी (इक्विटी स्टेक) देण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. हि ऑफर इतकी मोठी आहे की, ते आयपीएल इतिहासातील सर्वात आकर्षक डीलंपैकी एक मानले जात आहे. गंभीर यांच्या यशस्वी आयपीएल कारकीर्दीचा (विशेषतः KKR सोबतचा यशस्वी काळ) विचार करता, राजस्थान रॉयल्सला त्यांच्या नेतृत्वाखाली टीमला नवीन दिशा देण्याची अपेक्षा आहे.
मात्र, गंभीर यांच्यासमोर मोठी अडचण आहे. सध्या ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा बीसीसीआयसोबतचा करार २०२७ च्या वनडे विश्व कपपर्यंत आहे. लोढा समितीच्या शिफारशी आणि संघर्ष टाळण्याच्या नियमांनुसार एखादी व्यक्ती एकाच वेळी राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावर आणि आयपीएल फ्रेंचायझीच्या व्यवस्थापनात किंवा मालकीत असू शकत नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी गौतम गंभीर यांना प्रथम टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
टी-20 विश्व कप २०२६ मध्ये भारतीय टीम चांगली कामगिरी करत असताना गंभीर यांच्यावर पूर्ण फोकस आहे. त्यांनी टीमला मजबूत नेतृत्व दिले आहे आणि विश्व कप जिंकण्याच्या स्वप्नात ते गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत ते राष्ट्रीय जबाबदारी सोडून आयपीएलकडे वळतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत गंभीर यांची भारतीय संघासोबतच राहण्याची शक्यता जास्त दिसत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता गौतम गंभीर यांच्या निर्णयाकडे लागले आहे. ते राजस्थान रॉयल्सची ऑफर स्वीकारतील का, की टीम इंडियाची जबाबदारी पूर्ण करतील? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.






