T20 World Cup 2024 (Warm-up match) : सराव सामन्यात भारताने दाखवली ताकद; बांगलादेशचा 60 धावांनी केला पराभव…

T20 World Cup 2024 (Bangladesh vs India Warm-Up Match Result) : भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंडचे संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. त्यापूर्वी शनिवारी(1 जून) रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध सराव सामना पार पडला.
भारताने या सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. नझमुल हसन शांतौच्या नेतृत्वाखालील बांगलादेशला 60 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशासमोर 183 धावांचे लक्ष्य होते, मात्र ते 20 षटकात 9 विकेट्सवर 122 धावाच करू शकले.
बांगलादेशचे टॉप-5 फलंदाज 41 धावांवर बाद झाले होते. मात्र यानंतर शकिब अल हसन आणि महमुदुल्लाह यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण बांगलादेशला ते विजयापर्यंत नेऊ शकले नाही.बांगलादेशकडून महमुदुल्लाहने 28 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर शाकिब अल हसनने 34 चेंडूत 28 धावा केल्या. याशिवाय सौम्या सरकार, तनजीद हसनलिटन दास, नजमुल हसन शांतौ आणि तौहीद हृदय या फलंदाजांनी निराशा केली.
भारतीय संघाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 182 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. दरम्यान, नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने सांगितले की, विराट कोहली शुक्रवारी न्यूयॉर्कला पोहोचला आहे. त्यामुळे या अनुभवी खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे तो आजच्या सराव सामन्याचा भाग नाही.
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 1⃣8⃣3⃣ in the warmup match against Bangladesh 🙌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/EmJRUPmJyn #T20WorldCup pic.twitter.com/6CEMDec2cZ
— BCCI (@BCCI) June 1, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मासोबत सलामीला आलेला संजू सॅमसन 6 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. टीम इंडियाला पहिला धक्का 11 धावांच्या स्कोअरवर बसला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 19 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या झंझावाती खेळीनंतर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला.
सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 31 धावांची चांगली खेळी केली. त्याचवेळी शिवम दुबे 16 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन सादर केले. भारतीय संघाच्या या अष्टपैलू खेळाडूने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. त्याने आपल्या स्फोटक खेळीत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शरीफुल इस्लाम व्यतिरिक्त महमुदुल्ला, मेहंदी हसन आणि तनवीर इस्लाम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





