T20 World Cup 2024 (Super-8) : अँड्रिज गॉसची 80 धावांची खेळी व्यर्थ, चुरशीच्या सामन्यात द. आफ्रिकेचा यूएसएवर 18 धावांनी विजय…

T20 World Cup 2024 (Super-8, USA vs SA) : टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात बुधवारी ग्रुप-2 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका (USA) आमने-सामने होते. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला आहे.दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 176 धावा करू शकला.
अँड्रिज गॉसने 47 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. या डावात 5 षटकार आणि 5 चौकार मारले. हरमीत सिंगने त्याला साथ दिली.त्याने 22 चेंडूत 38 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. पण दोघेही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.
अमेरिकेच्या डावात कागिसो रबाडाने 19व्या षटकात हरमीत सिंगची विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली. अमेरिकेला शेवटच्या दोन षटकात 28 धावांची गरज होती. त्यानंतर हरमीत आणि अँड्रिज गॉस क्रीजवर होते.
19व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हरमीत झेलबाद झाला. त्याने 38 धावांची खेळी केली. गौससोबत त्याची 91 धावांची भागीदारी झाली. मात्र, हरमीत बाद झाल्याने सामना पलटला. रबाडाने 19व्या षटकात दोन धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात अमेरिकेला विजयासाठी 26 धावांची गरज होती आणि संघाला केवळ सातच धावा करता आल्या. अखेरच्या क्षणी कगिसो रबाडा याने चिवट गोलंदाजी करत गेमचेंजरची भूमिका बजावली. रबाडाने 4 ओव्हरमध्ये 18 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या.
🟢🟡CHANGE OF INNINGS | #SAvUSA
Runs on the board.
Time to defend in the field!💥#WozaNawe #BePartOfIt#OutOfThisWorld #T20WorldCup pic.twitter.com/CJzkfbPSlB
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 19, 2024
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही कारण सौरभ नेत्रावलकरने रीझा हेंड्रिक्सला त्याच्या दुसऱ्याच षटकात 11 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉकच्या 110 धावांच्या भागीदारीमुळे अमेरिका बॅकफूटवर गेली. पॉवरप्ले ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 64 धावा केल्या होत्या. क्विंटन डी कॉक आणि मार्करम यांनी मिळून गोलंदाजांची धुलाई करत संघाची धावसंख्या 10 षटकांत 101 पर्यंत नेली होती. याच दरम्यान, डी कॉकने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डी कॉक आणि मार्करम यांनी 12व्या षटकात एकूण 17 धावा काढल्या, पण पुढच्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्का बसला. हरमीत सिंगने प्रथम डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला गोल्डन डकचा बळी बनवले. डी कॉकने 40 चेंडूत 74 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 5 षटकारही लगावले.
त्यानंतर, अमेरिकेचा स्टार गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने 14.5 षटकात एडन मार्करमला बाद केले. कर्णधार एडन मार्करमचे अर्धशतक हुकले, त्याने 32 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील 50 धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला 190 च्या पुढे नेले. 15 षटकांत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 141 होती आणि पुढच्या 3 षटकांत 32 धावा झाल्या. एकवेळ दक्षिण आफ्रिका 200 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण सौरभ नेत्रावलकरने 19व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या आणि 20 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 194 धावांवर संपला. हेन्रिक क्लासेन 22 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 36 धावा करून तर ट्रिस्टन स्टब्स 16 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला.
सौरभ नेत्रावलकर पुन्हा चमकला
भारतीय वंशाचा यूएसएचा खेळाडू सौरभ नेत्रावलकर 2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खूप चर्चेत आला आहे. हा तोच गोलंदाज आहे ज्याने भारताविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीचे दोन मजबूत आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट घेतल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले आहेत. आता विश्वचषकात 4 सामन्यात त्याच्या 6 विकेट आहेत. याशिवाय हरमीत सिंगनेही दोन बळी घेतले.





