T20 World Cup 2024 : कोहली-बुमराह किंवा हार्दिक नव्हे, तर रोहित शर्माने ‘या’ तीन दिग्गजांना दिलं टी-20 विश्वचषक जिंकण्याचे श्रेय…

T20 World Cup 2024 Credit : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 29 जून रोजी टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने बार्बाडोसच्या भूमीवर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 13 वर्षांपासून सुरू असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. आता तब्बल दोन महिन्यांनंतर कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय तीन दिग्गजांना दिले. रोहितच्या या यादीत विराट कोहली, हार्दिक पांड्या किंवा जसप्रीत बुमराह यांचा समावेश नाही आहे.
टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकून बराच काळ लोटला आहे, पण त्याचे सेलिब्रेशन अजून संपलेले नाही. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि कर्णधार रोहित विश्वचषक ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते.
दरम्यान, रोहित शर्माने CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स दरम्यान टी-20 वर्ल्ड कपबद्दल भाष्य केले. या संवादात भारतीय कर्णधाराने विजयाचे श्रेय देताना तीन खास नावे घेतली. हिटमॅनने सांगितले की, “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रत्येक खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला होता आणि त्यामुळेच विश्वचषक जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो.”
रोहित ठरला क्रिकेटर ऑफ द इयरचा मानकरी
रोहित शर्माला CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये पुरूषांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. रोहित शर्माला त्याची उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधार म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला आहे अलविदा…
दरम्यान, 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. टी-20 विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता, जी या स्पर्धेची पहिली आवृत्ती होती.





