T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा कसाबसा विजय, आयर्लंडलवर 3 गडी राखून केली मात…

T20 World Cup 2024 (Pakistan vs Ireland) :– आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील 36 व्या सामन्यात अ गटातील पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड आमनेसामने होते. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आला होता.
चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडवर कसाबसा 3 गडी राखून विजय मिळवला. आयर्लंडने विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 18.5 षटकात 7 गडी गमवावे लागले. पाकिस्तानने यासह विश्वकरंडक मोहिमेतील शेवट विजयाने केला. पाकिस्तानचा हा दुसरा विजय ठरला. तर आयर्लंडची पाटी कोरीच राहिली.
Pakistan clinch a three-wicket win over Ireland in their final game of the tournament 🏏#PAKvIRE | #T20WorldCup pic.twitter.com/bftcrHeg76
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 16, 2024
न्यूयॉर्कमध्ये नव्हे तर फ्लोरिडामध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघासाठी 107 धावांचे लक्ष्यही कठीण झाले होते आणि त्यांना 19व्या षटकात विजय मिळवता आला. त्यासाठी त्यांना सात विकेट गमवाव्या लागल्या. एकवेळ पाकिस्तानने 62 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या आणि संघाची पुन्हा गळचेपी होईल असे वाटत होते. मात्र, कर्णधार बाबर आझम आणि अब्बास आफ्रिदी यांच्यात सातव्या विकेटसाठी झालेली 33 धावांची भागीदारी आणि त्यानंतर शाहीन आफ्रिदीने मारलेल्या दोन षटकारांनी पाकिस्तान संघाला विजयापर्यंत नेले.
कर्णधार बाबरने 34 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीने पाच चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 13 धावांची खेळी केली. अब्बासने 21 चेंडूत 17 धावा केल्या. याशिवाय पाकसाठी सैम अयूब ,मोहम्मद रिजवान यांनी प्रत्येकी 17 धावांचे योगदान दिले. या विजयासह पाकिस्तान अ गटात तिसऱ्या स्थानावर राहिले. या गटातून भारत आणि अमेरिका सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून आयर्लंडला फलंदाजी दिली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत आयर्लंडच्या डावाला सुरुंग लावला. आयर्लंडचा अर्धा संघ 32 धावांवर माघारी पाठवला. मात्र त्यानंतर आयर्लंडच्या काही फलंदाजांनी छोटेखानी पण निर्णायक खेळी केली, ज्यामुळे त्यांना 100 पार पोहचता आले. जॉर्ज डॉकरेल 11, गॅरेथ डेलेनी 31, मार्क एडेअर 15 आणि बॅरी मॅककार्थी याने 2 धावा केल्या. तर जोशुआ लिटील आणि बेंजामिन व्हाईट ही जोडी नाबाद राहिली. जोशुआने 22 आणि बेंजामिनने 5 धावा जोडल्या. तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि इमाद वसिम या दोघांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले. तर मोहम्मद आमिरने दोन गडी बाद केले.





