T20 World Cup 2024 : अमेरिकेत टी-20 विश्वचषक आयोजित करणं आयसीसीला पडले महागात, झाले ‘इतके’ कोटींचे नुकसान…

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता किती वाढली हे सध्या सांगणे कठीण आहे, पण या निर्णयामुळे आयसीसीचे नक्कीच मोठे नुकसान झाले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमेरिकेला टी-20 विश्वचषक 2024 चे यजमान बनवणे आयसीसीला महागात पडले आहे. आयसीसीला यामुळे 160 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
2024 मध्ये अशा प्रकारचा पहिला टी-20 विश्वचषक खेळला गेला होता, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले होते. मात्र, हा ऐतिहासिक विश्वचषक आयसीसीसाठी चांगला ठरला नाही. या मोठ्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मोठे नुकसान झाले. तसेच अमेरिकेतील क्रिकेट खेळपट्ट्यांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. येथील खेळपट्ट्यांमध्ये असमान उसळी आणि दुहेरी गती पाहायला मिळाली. त्यामुळे फलंदाजांना खूप त्रास झाला आणि कमी धावसंख्येचे सामने येथे झाले.
टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना अमेरिकेतच खेळला गेला होता. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झाला. विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी अमेरिकेत तात्पुरते नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले होते, जे नंतर उद्ध्वस्त करण्यात आले.
अमेरिकेत फक्त ग्रुप स्टेजचे सामने खेळवले गेले. भारत आणि पाकिस्तानसह अनेक संघांनी अमेरिकेत ग्रुप स्टेजचे सामने खेळले होते. याशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज सारख्या अनेक संघांनी वेस्ट इंडिजमध्ये ग्रुप स्टेजचे सामने खेळले. ग्रुप स्टेजनंतर सुपर-8, सेमीफायनल आणि फायनल मॅचेस वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केले होते.
टीम इंडियाने पटकावले होते विजेतेपद..
टीम इंडियाने 2024 टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. 2007 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, भारताला टी-20 विश्वचषक ट्रॉफी पुन्हा मिळण्यासाठी 17 वर्षे दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.





