T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा मोठा उलटफेर, न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास..

T20 World Cup 2024 (AFG vs NZ) : टी-20 विश्वचषक 2024 चा 14 वा सामना शनिवारी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने किवीजचा 84 धावांनी पराभव करत चालू स्पर्धेत मोठा उलटफेर निर्माण केला. या विजयासह राशिद खानचा संघ क गटातील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दोन सामने जिंकून त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत, तर किवीज पहिल्याच सामन्यात पराभवामुळे शेवटच्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत सुपर-8 साठी आपला दावा मजबूत केला आहे. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानने 10वा मोठा उलटफेर घडवला. यापूर्वी अमेरिकेने चालू स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून सर्वांनाच चकित केले होते.
आयसीसी टी-२० विश्वकरंड 2024मध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव करताना प्रथमच किवी संघाला नमविले आहे. अफगाण संघाचा न्यूझीलंडवर कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. याआधी वनडे आणि टी-20 मधील सर्व 4 सामने न्यूझीलंडच्या नावावर होते.
गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर शनिवारी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 15.2 षटकांत सर्वबाद 75 धावांत आटोपला.
अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने 80 धावांची खेळी केली. गुरबाजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले नववे अर्धशतक झळकावले. गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यात 103 धावांची सलामीची भागीदारीही झाली.
गोलंदाजीत कर्णधार राशिद खान आणि फजलहक फारुकी यांनी चमकदार कामगिरी करत प्रत्येकी 4 बळी घेतले. यंदाच्या विश्वकरंडकात अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय आहे. तत्पूर्वी, संघाने युगांडाचा 125 धावांनी पराभव केला. त्यामुळे अफगाण संघ आता क गटात अव्वल स्थानावर पोचला आहे.
रहमानउल्लाचे धडाकेबाज अर्धशतक
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजने संघाकडून 80 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात 3 विकेट पडल्या. प्रथम राशिद खान धावबाद झाला. त्यानंतर गुरबाजची विकेट पडली आणि शेवटी गुलबदिन नायब खाते न उघडताच माघारी परतला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्ट यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसनला एक विकेट मिळाली.





