T20 cricket | तामिळनाडू लीगमध्ये फिक्सिंग

चेन्नई – देशांतर्गत टी-20 क्रिकेट स्पर्धांमधील तुफान लोकप्रीय ठरत असलेल्या तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये फिक्सिंग घडत असल्याचा गौप्यस्फोट राजगोपाला सतीश या खेळाडूने केला आहे. आपल्याला फिक्सिंगसाठी तब्बल 40 लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याची तक्रार त्याने स्थानिक पोलीसांकडे केली असून याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
माजी रणजीपटू सतीशने हा प्रस्ताव मिळाल्यावर बेंगळुरु पोलिसांकडे धाव घेतली. रणजी स्पर्धेत सतीश तामिळनाडू व आसामकडून खेळला आहे. तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघासोबत देखील जोडला गेला होता. तो सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (टीएनपीएल) चेपॉक सुपर गिलीजकडून खेळतो. सतीशने केलेल्या या आरोपांचा तपास करण्यासाठी विशेष तपास समिती नेमली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला अशा प्रकरणात थेट चौकशी, शोध मोहिम आणि जप्तीचा अधिकार नाही. त्यांना यासाठी पोलिसांवरच अवलंबून रहावे लागते.
याबाबतची तक्रार बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटमधील बी लोकेश यांनी जयानगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत 3 जानेवारीला बन्नी आनंद नावाच्या एका व्यक्तीने सतिशशी इन्स्टाग्रामवरुन संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याला 40 लाखाची ऑफर दिली आणि अजून दोन खेळाडू यासाठी तयार झाल्याचे सांगितले. सतिशने या व्यक्तीच्या ऑफरला नकार दिला होता व लगेचच पोलीसंशी संपर्क साधला होता.





