IPL 2024 : आशुतोष शर्माचा T20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम, जगातील सर्व दिग्गज फलंदाजांना टाकलं मागे….

IPL 2024, Big record of Ashutosh Sharma : आयपीएल 2024 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने चाहत्यांची आणि त्यांच्या टीमची मने जिंकली आहेत. त्यातील एक खेळाडू म्हणजे आशुतोष शर्मा. पंजाब किंग्जकडून त्याने यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. जिथे त्याला त्याचा पहिला सामना 4 एप्रिल 2024 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असलेल्या आशुतोष शर्माने पंजाब किंग्जचे सामने स्वबळावर जिंकले आणि अनेक वेळा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. दरम्यान, त्याने एक मोठा टप्पा गाठला आहे.
टी20 मध्ये मोठा विक्रम केला नावावर…
आशुतोष शर्माने ( Ashutosh Sharma ) आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 28 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. पंजाब किंग्ज संघाला कठीण काळात सांभाळून त्याने ही खेळी खेळली. पंजाबसाठी तो सामना जिंकू शकला नसला तरी त्याची फलंदाजी अतिशय उत्कृष्ट होती. या सामन्यानंतर त्याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आशुतोष शर्मा 199.65 च्या स्ट्राईक रेटने टी-20 मध्ये सर्व फलंदाजांच्या पुढे गेला आहे. येथे आम्ही त्या फलंदाजांबद्दल बोलत आहोत ज्यांनी या फॉरमॅटमध्ये किमान 500 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नाही. त्याच्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटमुळे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. आशुतोषने टी-20 क्रिकेटमध्ये 199.65 च्या स्ट्राईक रेटने 500 धावांचा टप्पा ओलाडंला आहे.
आशुतोष शर्माची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी
पंजाब किंग्जने या हंगामात आशुतोष शर्माला 20 लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले होते. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 156 धावा केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतक आणि तीन 30+ डावांचा समावेश आहे. पंजाब किंग्जच्या फलंदाजाने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 31 धावांची खेळी केली. तेव्हापासून तो मुल्लानपूरमध्ये आपले 3 सामने खेळला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने आठव्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली. त्याची टीम पंजाब किंग्सबद्दल बोलायचे झाले तर त्यानी आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 2 जिंकले आहेत. संघाने आपला शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध मुल्लानपूर, मोहाली येथे खेळला. पंजाब किंग्जने हा सामना 9 धावांनी गमावला. सध्या संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे.
T20 कारकीर्द कशी होती?
या युवा फलंदाजाने 12 जानेवारी 2018 रोजी रायपूर येथील विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश सामन्यातून टी-20 कारकिर्दीची सुरुवात केली. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 19 सामन्यांपैकी 18 डाव खेळले आहेत. आशुतोषच्या बॅटमधून 288 चेंडूत एकूण 575 धावा झाल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 84 धावांची आहे. त्याच्या T20 कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 5 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याने 48 चौकार आणि 43 षटकार मारले आहेत.





