पुणे जिल्हा | क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कपसाठी निवड

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कपसाठी निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एशियन टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गोवा (मडगाव), येथे झालेल्या ११ व्या ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कपसाठी महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणीचे आयोजन शनिवार, दि. १८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन (एटीसीए) क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील मयांक घुले (१९ वर्ष मुले), प्रसन्न खिलारी (१४ वर्ष मुले), पद्मपाणि साळवे (१४ वर्ष मुले), कौशल गायकवाड (१६ वर्ष मुले), तनिश कोकणे (१६ वर्ष मुले) हे पाच विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघामधून खेळण्यासाठी पात्र ठरले असून गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक तुषार काळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी “माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात देखील उज्ज्वल यश संपादन करावे या हेतूनेच सुसज्ज अशा क्रिकेट स्टेडियम ची उभारणी आणि क्रिकेट अकादमी ची सुरुवात मी केली आहे, या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी भविष्यात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवावे आणि आंबेगावचे नाव मोठे करावे” असा संदेश शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.





