SMAT 2024 | आयपीएल लिलावात राहिला अनसोल्ड, आता T20 मध्ये बॅक-टू-बॅक शतके झळकावून केला ‘हा’ विक्रम…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातचा सलामीवीर उर्विल पटेलची चमकदार कामगिरी कायम आहे. त्याने मंगळवारी इंदूरच्या एमराल्ड हायस्कूल मैदानावर उत्तराखंडविरुद्ध अवघ्या 36 चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि गुजरातला केवळ 13.1 षटकांत 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
उर्विल पटेलने सहा दिवसांत दुसरे टी-20 शतक झळकावले. या शतकामुळे तो वेगवेगळ्या सामन्यांमध्ये 40 पेक्षा कमी चेंडूंचा सामना करत दोन शतके करणारा टी-20 क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. गेल्या आठवड्यात याच मैदानावर त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूंत विक्रमी शतक झळकावल्यानंतर ही कामगिरी झाली आहे.
गुजरातने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावा केल्या. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उर्विल पटेलने गुजरातकडून चमकदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 41 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार आणि 1 षटकारासह 115 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याची आक्रमक फलंदाजी इतकी अप्रतिम होती की गुजरातने 41 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. गुजरातने 13.2 षटकांत 2 गडी गमावून 185 धावा केल्या.
त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत ठोकले शतक…
तत्पूर्वी, त्रिपुराविरुद्ध 27 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात उर्विल पटेलने 156 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना 35 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 12 षटकार आणि 7 चौकार मारले. या खेळीमुळे गुजरातने अवघ्या 10.2 षटकांत विजय मिळवला होता. या सामन्यातच त्याने 28 चेंडूत शतक झळकावले, जे भारतीय क्रिकेटपटूचे टी-20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आहे. या डावात त्याचा स्ट्राइक रेट 322.86 होता.
जागतिक क्रिकेटचा विचार करता उर्विल पटेल या बाबतीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याआधी एस्टोनियाच्या साहिल चौहान याने 27 चेंडूत शतक झळकावले असून तो या बाबतीत अव्वलस्थानी आहे.जलद धावा करण्याचा उर्विल पटेलचा छंद नवीन नाही. त्याच्या पहिल्या 28 चेंडूंच्या टी-20 शतकाच्या अगदी एक वर्ष आधी, त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्ध फक्त 41 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
आयपीएलमध्ये होता गुजरात टायटन्सचा भाग…
26 वर्षीय उर्विल पटेल आयपीएल 2023 हंगामासाठी गुजरात टायटन्स संघाचा एक भाग होता, त्याला 20 लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते. तथापि, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही, गुजरात टायटन्सने आयपीएल 2024 लिलावापूर्वी पटेलला रिलीज केले. त्याने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला, परंतु कोणीही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही.





