England vs New Zealand WTC Points : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांना आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन WTC गुण वजा केले आहेत. यासोबतच संपूर्ण संघाला मॅच फीच्या 15 टक्के वेगळा दंडही ठोठावण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चमकदार कामगिरी करत किवी संघाचा 8 विकेटने पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंडला मोठा धक्का….
आयसीसीने न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांना मोठा धक्का दिला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटचा फटका सहन करावा लागला आहे. ICC ने इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी तीन WTC गुण वजा केले आहेत.
New Zealand drop to fifth place in the World Test Championship standings after both teams were docked three points for a slow over-rate in the first match of the #NZvENG series pic.twitter.com/8SydYuGpgJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 3, 2024
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून मिळालेल्या या शिक्षेमुळे किवी संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. पेनल्टीनंतर, न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी आता 47.92 झाली आहे आणि येथून पुढे सर्व सामने जिंकल्यानंतरही ते केवळ 55.36 टक्के गुणसंख्येपर्यंतच पोहोचू शकतील. याबरोबरच न्यूझीलंडलाही एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले असून ते आता चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहेत.
इंग्लंड शर्यतीतून जवळपास बाहेर…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आधीच खूप मागे पडलेला इंग्लंड आयसीसीने दिलेल्या शिक्षेनंतर जेतेपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. इंग्लंडची सध्या गुणांची टक्केवारी 42.50 इतकी असून ते सहाव्या स्थानावर आहेत. आयसीसीच्या कारवाईचा सर्वात मोठा फायदा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला होईल, ज्यांना न्यूझीलंड संघाकडून मोठा धोका दिसत होता. आता किवी संघाने इंग्लंडविरुद्धचे उरलेले दोन्ही सामने जिंकले तरी अंतिम फेरी गाठणे संघाला खूप कठीण जाईल.
भारतासाठी अत्यंत फायद्याची बाब….
न्यूझीलंडची ही पेनल्टी 61.11 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या भारतासाठी अत्यंत फायद्याची बाब आहे. भारतासाठी ही चांगली बातमी आहे कारण, आता शर्यतीत भारत आणि ऑस्ट्रेलियासह फक्त चार संघ आहेत आणि यामध्ये भारताची पहिल्या दोन स्थानांवर पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका (59.26), ऑस्ट्रेलिया (57.26) आणि श्रीलंका (50) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.