बर्न – सर्वच देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल हे गॅजेट सर्वात लोकप्रिय झाले आहे. या मोबाईलमध्ये घड्याळासकट सर्व सुविधा उपलब्ध असल्याने आता घड्याळाचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र घड्याळाच्या बाजारपेठेत कित्येक वर्षे नाव असणाऱ्या स्वित्झर्लंड देशाचा अनुभव काहीसा वेगळा आहे.
मोबाईलच्या माध्यमातून घड्याळाची सेवा जरी उपलब्ध होत असली तरी स्विस घड्याळांना अद्यापही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतीय नागरिकांनी तब्बल 933 कोटी रुपयांच्या स्विस घड्याळाची खरेदी केली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये संपूर्ण जगभरात दोन कोटी 34 लाख स्विस घडाळ्यांची विक्री झाली असून हे आतापर्यंतचे रेकॉर्ड मानले जाते. यापैकी फक्त एक कोटी 80 लाख घडाळ्यांची स्वित्झरलँडमधून निर्यात करण्यात आली बाकी घड्याळांची विक्री देशांतर्गतच झाली होती.
महामारीच्या कालावधीमध्ये घड्याळ उद्योगावर थोडाफार परिणाम झाला असला तरी पुन्हा एकदा हा उद्योग बहरात आला आहे. स्विस वॉच इंडस्ट्री फेडरेशनने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये स्विस घड्याळच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून मागणीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
मनगटावर बांधण्यात येणारे रिस्ट वॉच हे अनेकांसाठी स्टेटसचे प्रतीक झाल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये उलट किमती आणि महागडी घड्याळ घेण्याकडे युवा पिढीचाही कल वाढला आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता घड्याळांच्या सर्वसाधारण किमती साडेचार हजार रुपयांपासून तीन लाख रुपये पर्यंत असू शकतात.
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये 33 हजार रुपये किंमत असलेल्या घड्याळांच्या मागणीमध्ये तब्बल 104% वाढ झाली आहे. अनेक कंपन्या फक्त महागड्या घड्याळांच्या उत्पादनावरच आता लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत. कारण महागडी घड्याळे वापरणे हा एक स्टेटस सिम्बॉल बनू पहात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये सुद्धा घड्याळ वापरण्याची फॅशन वाढू लागल्याने आता स्वित्झर्लंडमधील काही कंपन्यांनी महिलांसाठी खास उत्पादन सुरू केले आहे.