Swine Flu Alert: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूचा विळखा घट्ट! ३ दिवसांत १३ नवे रुग्ण, सप्टेंबरमध्येच आकडा ३० पार
Swine Flu Alert: ऑगस्टमध्ये ३१ आणि सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ३० रुग्ण आढळल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्गाचा वेग वाढला; जानेवारीपासून आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६७ वर.

Swine Flu Alert – पावसाळा आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अवघ्या सहा दिवसांत १७ रुग्ण आढळल्यानंतर आता १० सप्टेंबरच्या आकडेवारीत रुग्णसंख्या थेट ३० वर पोहोचली आहे. अवघ्या तीन दिवसांत स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल १३ रुग्णांची वाढ झाली आहे.
झपाट्याने वाढणारी ही रुग्णसंख्या नागरिकांसह महापालिका वैद्यकीय विभागाचीही चिंता वाढविणारी ठरत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये शहरात स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी ते जून या कालावधीत एकही रुग्ण नोंदविला गेला नाही. मात्र, जुलैपासून पुन्हा स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले.
जुलैमध्ये ५ रुग्ण, ऑगस्टमध्ये तब्बल ३१ रुग्ण, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत. यामुळे २०२६ मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत शहरातील स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची एकूण संख्या ६७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतच तब्बल ६१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांच्या तुलनेत संसर्गाचा वेग वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या नोंदीनुसार आतापर्यंत स्वाइन फ्ल्यूमुळे संशयित किंवा निश्चित मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, सर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, तसेच गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.




