दारू न मिळाल्याने तळीरामाने केली आत्महत्या
एकाचा विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

कोपरगाव – करोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. मागील पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने एका तळीरामाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला काम नाही. तसेच पोटात दारू नाही. बाहेर फिरायला बंदी. त्यामुळे आपल्या मित्रांच्या गाठी-भेटी नाहीत, बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा थरकाप सुरू झालेला. चिडचिड करीत अनेक तळीराम घराच्या खिडक्यांतून बाहेर डोकावत आहेत. बाहेर करोनाच्या भीतीने रस्ते निर्मनुष्य झालेत. चुकून कोणी गेला, तर पोलिसांच्या काठ्या अंगावर पडतात. दररोज दारूच्या नशेत तुर्रर्र होऊन झिंगणाऱ्या तळीरामांची करोनामुळे चांगलीच पंचाईत झाली. त्यांच्यावर घरात निमुटपणे बसण्याशिवाय पर्याय राहीला नाही. तळीरामांच्या कुटुंबाला करोनामुळे दारू बंद असल्याचा आनंद वाटतो. पण तळीरामाच्या जीवाची घलमेल होत आहे.
अशातच कोपरगाव शहरातील दोन तळीरामांनी दारू मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या पैकी एका 25 वर्षीय युवकाला अनेक दिवसांपासून पिण्यासाठी दारू मिळाली नाही म्हणून त्याने वैतागून विष प्राशन करून आपले जीवन संपवले. तर गजानननगर येथील एक तळीरामाला दारू मिळत नसल्याने वैतागून त्याने विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विजेच्या खांबावर चढून तारांना पकडण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला समजूत काढून खांबावरून खाली उतरविण्यात आले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.





