Sweet Corn: पावसाळी ट्रेकमध्ये मक्याचे कणीस मिळणार की नाही? बाजारातून आली अत्यंत वाईट बातमी
Sweet Corn: मॉन्सूनच्या विलंबामुळे मक्याच्या उत्पादनाला मोठा फटका; मार्केट यार्डात कणसाची आवक थेट ५०० ते ६०० गोण्यांवर आली.

Sweet Corn – पावसाळा म्हंटलं की धुके, डोंगर-दऱ्यांवरची हिरवाई आणि हातात गरमागरम भाजलेले मक्याचे कणीस अथवा उकडलेले दाणे असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. यंदा मॉन्सूनच्या विलंबामुळे कणसाचे उत्पादन घटले असून पर्यटनस्थळांकडेही पर्यटकांनी पाठ फिरविल्याने मक्याच्या मागणीवरही परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत कणसाच्या दरात किलोमागे सहा ते सात रुपयांची घसरण झाली आहे.
घाऊक बाजारात कणसाला किलोला १२ ते १६ रुपयांचा दर मिळत असून किरकोळ बाजारात कणसाची ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. मार्केट यार्डात खेड, मंचर, नारायणगाव, बारामती, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातून कणसे येतात. दरवर्षी याच काळात बाजारात दिसणारी कणसांची रेलचेल यंदा कमी आहे. मॉन्सून दाखल होऊनही सक्रिय नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
एरवी जूनच्या मध्यात नेहमी ३८ ते ४० किलो वजनाच्या सुमारे १ हजार ते १ हजार २०० गोण्या बाजारात येतात. यंदा ही आवक केवळ ५०० ते ६०० गोण्यांपर्यंत घसरली आहे. पाण्याअभावी मक्याच्या कणसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे कणसांचा आकार, दाण्यांची भर आणि एकूणच गुणवत्ता कमी झाल्याने कणसांची प्रतवारी घसरली आहे. पावसाअभावी पर्यटनस्थळांकडेही पर्यटकांनी पाठ फिरविल्याने कणसांची अपेक्षेप्रमाणे खरेदी सुरू नाही.
जूनच्या मध्यावधीत प्रतिकिलो १८ ते २२ रुपये दर मिळणाऱ्या कणसांना यंदा १२ ते १६ रुपये दर मिळत आहेत. पुढील काही दिवसांत मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर दिलासा मिळेल. तसेच पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढल्यास कणसांच्या मागणीलाही चालना मिळू शकते. तोपर्यंत मात्र बाजारात कणसांची आवक आणि व्यापार दोन्हीही मंदावलेलेच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
“मॉन्सून सक्रिय नसल्यामुळे पावसाळी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मक्याच्या कणसांना फटका बसला आहे. मक्याच्या पिकाला पुरेसे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही घटले आहेत. सध्या आवक निम्म्यावर आली असून चांगल्या पावसानंतरच बाजारात सुधारणा अपेक्षित आहे.”
– पांडुरंग सुपेकर, मक्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.




